मडगाव: भाजपाच्या प्रवक्त्याला धमकी दिल्याचे कारण पुढे करुन विरोधी आमदार रोहन खवंटे यांना झालेली अटक जरी निंदनीय असली तरी या अटकेच्या विरोधात एकी दाखवून विरोधी आमदारांनी गुरुवारी विधानसभेत जे काय केले ते पाहिल्यास हे आमदार सर्कशीत काम करत असल्यासारखे वाटले, अशी टीका आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक एल्वीस गोमीस यांनी व्यक्त केली.गोमीस म्हणाले, जी घटना विधानसभा संकुलात घडल्याचे सांगितले जाते त्या घटनेची पोलिसांमार्फत चौकशी करता आली असती. यासाठी आमदाराला अटक करण्याची कुठलीही गरज नव्हती. खरे तर कुठल्या प्रकरणात अटक व्हावी आणि कुठल्या प्रकरणात अटक होऊ नये यावरही चर्चा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.यापूर्वी रोहन खवंटे मंत्री असताना तेही पोलीस यंत्रणेचा असाच गैरवापर करायचे. रोहन खवंटेनी सांगितल्यामुळे मुंबईतील एका वकिलाला गोवा पोलिसांनी अटक केली होती, याकडे गोमीस यांनी लक्ष वेधले. सध्या जे विरोधक एकत्र आले आहेत, त्याबद्दल बोलताना गोमीस म्हणाले, ही तर तथाकथित एकी. एका आमदाराला अटक झाली म्हणून एकत्र येणारे हे विरोधक भरती रेषा नियंत्रण कायदा, कोळसा प्रदूषण, म्हादई प्रश्न यासारख्या सामान्य लोकांना सतावणाऱ्या प्रश्नावर एकत्र का आले नाहीत असा सवाल त्यांनी केला. आज जे भाजपाच्या विरोधात आघाडी उघडत आहेत, त्यातीलच काही आमदारांमुळे गोव्याच्या जनतेचा कौल नसतानाही भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. आता त्यांना सत्तेतून बाहेर काढल्यामुळेच आलेल्या नैराश्यातून ते आता भाजपाला विरोध करतात असे गोमीस म्हणाले.
'गोव्यातील विरोधकांचे विधानसभेतील वागणे एक सर्कसच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 7:00 PM