पणजी: वनहक्क विषयक दाव्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत महसूलमंत्री रोहन खंवटे आणि विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांची चांगलीच जुंपली. मागील विधानसभा अधिवेशनात दिलेलीच आश्वासने आताही दिली जात आहेत हे कवळेकर यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर महसूलमंत्री त्यांच्यावर भडकले. त्यावर कवळेकर यांनीही त्यांना धारेवर धरले. आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी काणकोणमधील लोकांचे वनहक्काविषयीचे दावे का पडून आहेत या विषयी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सरकार गोमंतकीयांच्या हिताची किती काळजी घेत आहे, विशेष करून आदिवासी भागातील लोकांच्या वनहक्कांविषयी आणि कुमेरी विषयी सरकारला किती जाणीव आहे आणि त्यांच्या हक्कांसाठी सरकार किती प्रयत्न करते आहे याची माहिती महसूलमंत्री खंवटे देत होते. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर विरोधीपक्षनेते कवळेकर व संबंधीतांची बैठक घेतली जाईल आणि या मुद्यावरील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. त्यावर कवळेकर उभे राहिले आणि खंवटे यांनी हेच आश्वासन मागील विधानसभा अधिवेशनातही दिले होते असे सांगितले. प्रत्यक्षात आपण त्यांना याची आठवण करूनही त्यांनी बैठक घेतलीच नाही असे सभागृहात सांगितले. याच कारणामुळे खंवटे कवळेकर यांच्यावर भगडले व नंतर दोघातही शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले झाले. सभापतीना मोठ्या कष्टाने त्यांना शांत करावे लागले. लोकांचे वनहक्काचे दावे पडून राहण्याची कारणे ही लोकांना वेगवेगळी कागदपत्रे सादर करायला सांगितले जात आहे ही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हे जमीनी मोजण्यासाठी जी मशिने वापरली जात आहेत ती कमी असल्यामुळे कामे कमी गतीने होत आहेत. अधिक मशिन्स उपलब्ध करून देण्यात यावीत. शिवाय ही मशिन्स अधुन मधून बंद पडत असल्यामुळे समस्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर इजिदोर फर्नांडीस यांनी मशिन्सशिवाय टेप घेऊन मोजणी करण्याची सूचना केली. महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी मशिन्सची समस्या दूर केली जाणार असल्याचे सांगितले. त्यात सॉफ्टवेरची जरा समस्या होती ती आता दूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वनहक्क प्रकरणातील एका काणकोणमध्येच १३३ फाईल्स अजून पडून असल्याची माहिती महसूलमंत्र्यांकडून देण्यात आली. या प्रकरणांची छाननी झालेली नसल्यामुळे प्रकरणे का पडून राहिली आहेत असे कारणही देण्यात आले आहे. .
वनहक्क मुद्यावर महसूलमंत्री विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:18 PM