लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : विरोधी आमदारांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली. आपल्याविरोधातील आरोप खोटे असे गावडे यांचे म्हणणे असले तरी, या प्रकरणी चौकशी होऊ द्या, अशी मागणी काही आमदारांनी केली आहे.
भाजपच्या कोअर टीमच्या सदस्यांमध्येही नव्या प्रकरणाविषयी चर्चा सुरू आहे. तरीदेखील मंत्री गावडे यांना भीवपाची गरज ना, असा सूर काही मंत्र्यांमध्ये आहे. कारण मुख्यमंत्री सावंत व गावडे यांचे संबंध अजून तरी चांगले आहेत. 'होय, व्हायरल ऑडिओमधील आवाज माझाच' या ऑडिओ क्लिपबद्दल गावडे व रेडकर यांच्यातील संभाषणाची क्लिप मंगळवारी व्हायरल झाली. त्यानंतर याविषयी समाज माध्यमांसह विविध स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
ढवळीकर यांनी दिला 'त्या' कटू आठवणींना उजाळा
वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, याच मंत्र्याने मंत्रिमंडळ बैठकीतील माझ्याबाबत केलेले गैरवर्तन सर्वश्रुत आहे. त्यानंतर विधानसभेतही अनेकदा हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाबतीत जे घडले, ते मी आता विसरलो आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट गंभीरपणे घ्यायला हवी. कारवाई वगैरे गोष्टी पक्ष संघटनेतून व्हायला हव्यात.
'होय, व्हायरल ऑडिओमधील आवाज माझाच'
या ऑडिओ क्लिपबद्दल आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना पत्रकारांनी विचारले असता, 'होय, व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज माझाच आहे', असे ते म्हणाले. परंतु अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. प्रत्येक प्रश्नावर त्यांनी 'नो कमेंट' अशीच उत्तरे दिली. तुम्ही धमकीच्या या प्रकाराबद्दल तक्रार केली होती का? तुमच्या फोनवरून हा ऑडिओ बाहेर कसा काय पोहोचला? असे सवाल पत्रकारांनी केले. परंतु आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे सांगून ते निघून गेले.
चौकशीसाठी सरकारवर दबाव
कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना दिलेल्या धमकीच्या चौकशीसाठी सरकारवर आता दबाव येऊ लागला आहे. काही सत्ताधारी आमदारांनीही गावडे यांचे हे वर्तन चुकीचे असल्याचे मत व्यक्त्त केले आहे. व्हायरल ऑडिओतील आवाज आपलाच असल्याचे रेडकर यांनी म्हटल्याने गावडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सभापती म्हणतात...
व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना सभापती रमेश तवडकर म्हणाले की, आहे. 'लोकप्रतिनिधी असलो तरी आम्ही लोकांचे सेवक आहोत. सार्वजनिक जीवनात कसे वागावे याबाबत प्रत्येकाने भान ठेवायला हवे.
हा सत्तेचा माज
सत्ता डोक्यात भिनली आहे. अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन कापीन ही धमकी हा अहंकाराचा माज आहे. सत्ता विनयेन शोभते, हे मंत्र्याने ध्यानात ठेवायला हवे. 'लोकप्रतिनिधींनी कोयते घेऊन फिरतात का?' सत्तेचा गैरवापर म्हणजे नक्की काय, आपल्याकडे सत्ता असल्यास काय करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या घटनेमुळे आता आपल्यालाही भीती वाटू लागली आहे. कारण आपण आमदार असलो तरी सर्वसामान्यच व्यक्ती आहे. - आमदार वेंझी व्हिएगश, आमदार, आप.
माफी मागावी
मंत्री किंवा इतर लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे चुकीचे आहे. मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याची माफी मागावी. अधिकारी काम करत नसतील तर बोलता येते. पण अधिकाऱ्यांना अवमानास्पद बोलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींनी समाजासमोर चांगला आदर्श ठेवावा. याची दखल मुख्यमंत्री किंवा पक्षाने घेणे आवश्यक आहे. - मायकल लोबो, आमदार भाजप.
चौकशी व्हावी
मंत्री गोविंद गावडे यांचा जो ऑडिओ व्हायरल झाला आहे, त्यानुसार मंत्र्याने सरकारी अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकावणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. अधिकाऱ्यांना अशी धमकी दिली जाऊ शकत नाही. याप्रकरणात जर संबंधित मंत्र्यांने खरेच धमकावले असेल, तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. या प्रकरणाची चौकशी करावी. - कुज सिल्वा, आमदार वेळ्ळी
थर्ड अंपायरने निर्णय घ्यावा
मंत्र्याकडून सरकारी अधिकाऱ्याला धमकावण्याचा प्रकार होणे ही लाजिरवाणी बाब आहे. क्रिकेट या खेळात जसे अंपायर निर्णय देतो, मंत्र्याने बॅटिंग केली व संचालकांनी बॉलिंगही केली. त्यामुळे आता थर्ड अंपायरची भूमिका निभावत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय द्यावा. - वीरेश बोरकर, आमदार, आरजी.