पणजी - गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासमोरील अडचणी अजून कमी झालेल्या नाहीत. चौकशी यंत्रणांनी विरोधी पक्षनेत्याला आता पूर्णपणे घेरले असल्याने गोव्याचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. बहुतांश काँग्रेस आमदारांनी सध्या मौन पाळले आहे.
देशात कधीच मटका जुगाराची कागदपत्रे तथा स्लीप विरोधी पक्षनेत्याच्या घरात सापडल्याचे किवा अशा प्रकारणी विरोधी पक्षनेत्याविरूद्ध गुन्हा नोंद झाल्याचे उदाहरण नाही. गोव्यातील काँग्रेसच्या वाट्याला मात्र ही नामुष्की आली आहे. काँग्रेसचे जे आमदार एरव्ही सरकारच्या विविध धोरणांवर टीका करायचे ते आता गप्प झाले असून आमदारांच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. एकटे आलेक्स रेजिनाल्ड लाँरेन्स हे सरकारवर अजूनही टीका करतात. सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत असल्याचे रेजिनाल्ड यांचे म्हणणे आहे. अत्यंत ज्येष्ठ आमदार असलेले लुईझिन फालेरो, प्रतापसिंह राणे, सुभाष शिरोडकर किंवा दिगंबर कामत यांनी अजून कोणतेही भाष्य केलेले नाही.
आम आदमी पक्षाने मात्र सरकार फक्त विरोधकांना लक्ष्य बनवत असल्याची टीका केली व सरकारधील काही गैरव्यवहारांवर बोट ठेवून कारवाई करण्याचे आव्हान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले. विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्या विरुद्ध बेहिशेबी मालमत्ता प्रकरणीही गुन्हा नोंद झाला आहे. मटका स्लीप प्रकरणी कवळेकर यांना अटकपूर्व जामीनासाठीही धाव घ्यावी लागली. आपल्या घरात नव्हे तर भावाच्या कार्यालयात पोलिसांना मटका स्लीप सापडल्याचा कवळेकर यांचा दावा आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने कवळेकर यांच्या निवासस्थानाबाहेर एवढे दिवस जे पोलिस सुरक्षेसाठी असायचे त्यांनाही बोलावून प्रश्न विचारण्याचे आता चौकशी यंत्रणेने ठरवले आहे.