- घोटाळे लपविण्यासाठी वेळ वाया घालविल्याचा आरोप
पणजी: गोवा गृहनिर्माण महामंडळाच्या जमीन घोटाळ््यासंबंधीचा प्रश्न चर्चेला येण्यापासून टाळण्यासाठी सत्ताधारी आमदाराच्या प्रश्नावरच वेळ संपविण्याची रणनीती वापरल्याचा आरोप करून विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. अपक्ष आमदार विजय सरदेसाई आणि रोहन खवंटे यांनी या मुद्द्यावर सभात्याग करताच मॉविन गुदिन्हो आणि बाबूश मोन्सेरात यांच्यासह कॉंग्रेस आमदारांनीही तो कित्ता गिरविला. आमदार बाबूश मोन्सेरात यांचा गृहनिर्माण घोटाळ््यासंबंधी प्रश्न यादीत ५ व्या क्रमांकावर होता.
सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केवळ तीनच प्रश्नच चर्चेला येऊ शकले. मिकी पाश्ेको यांचा मुख्य सचिवांविरुद्धच्या तक्रारी संंबंधी आमदार मिकी पाशेको यांनी विचारलेला प्रश्न. त्यानंतर आमदार सुभाष फळदेसाई आणि नंतर प्रमोद सावंत यांचे प्रश्न. फळदेसाई यांच्या सांगे येथील प्रश्नावर चर्चा सुरू असताना एका मागून एक असे तिघा सत्ताधारी आमदारांनी त्यावर उपप्रश्न विचारले. तसेच सत्ताधारी गटातील पाच जणांनी उपप्रश्नासाठी बटन दाबले. उपप्रश्न लांबत आहेत हे पाहून विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड आणि नरेश सावळ यांनी या प्रकाराला तीव्र आक्षेप घेतला. महत्वाचे प्रश्न चर्चेला येण्यापासून टाळण्यासाठी शुल्लक प्रश्न विचारून सभागृहाचा वेळ घालवित असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या गदारोळातच आमदार सिद्धार्थ कुंकळ््येकर हे प्रश्न विचारायला उभे राहिले असता विरोधी सदस्यांनी निषेध करून सभात्याग केला.
विरोधीपक्षनेते प्रतापसिंग राणे, मॉवीन गुदिन्होसह सर्व यांच्यासह सर्व कॉंग्रेस आमदार, बाबुश मोन्सेरात, अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खवंटे, नरेश सावळ यांनी सभात्याग केला. मिकी पाशेको, कायतान सिल्वा आणि बेन्जामीन सिल्वा हे सभागृहात बसून राहिले.
‘बोलणे आमचा हक्क’
सांगेतील बुडबुडतळे व इतर स्थळांच्या सुशोभिकरणाविषयीच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॅसिनो व इतर महत्त्वाच्या प्रश्न बाकी आहेत असे उभे राहून सागंतिले. त्यामुळे सुभाष फळदेसाई, निलेश काब्राल आणि सिद्धार्थ कुंकळ््येकर यांनी त्याला तीव्र आक्षेप घेत ‘आमच्या मतदारसंघातील समस्यांवर बोलण्याचा हक्क आहे’ असे सांगितले. प्रत्यक्षात सांगे मतदारसंघाशी संबंधित प्रश्न होता आणि कुडचडेचे निलेश काब्राल आणि पणजीचे सिद्धार्थ कुंकळ््येकर यांनी आपल्या सूचना करण्यासाठी बराच वेळ घेतला.
काय आहे गृहनिर्माण घोटाळा
ज्या गृहनिर्माण महामंडळाच्या घोटाळ््या संबंधीचे प्रश्न टाळण्यासाठी भाजप सदस्यांनी नियोजनबद्धरित्या सभागृहाचा वेळ वाया घालविला असा विरोधकांनी दावा केला तो घोटाळा आहे नेवरा - बार्देश याठिकाणी संपादनासाठी घेतलेल्या २.०६ लाख चौरस मीटर जमीनीचा आहे आणि हा प्रश्न बाबूश मोन्सेरात यांचा होता. ११ आॅगस्ट २००६ रोजी गृहनिर्माण मंडळाच्या झालेल्या बैठकीत नेरूल येथील २३/१ व २३/२ मधील जमीन गृहनिर्माणासाठी संपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महसूल खात्यामार्फत भूसंपादनाची प्रक्रियाही पार पाडण्यात आली. खाजगी वनक्षेत्र असलेली ही जमीन बांधकाम क्षेत्रात रुपांतर करून घेण्यात आली. गोवा आर्थिक महामंडळाकडे ५० लाख रुपयांची ठेवही त्यासठी जमा करण्यात आली होती. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर केवळ अधिसूचना जारी करणे बाकी होते. परंतु २७ डिसेंबर २०१४ पर्यंत म्हणजे प्रक्रिया रद्दबातल ठरेपर्यंत अधिसूचना जारी न करता ठेवल्यामुळे जमिनीचे भुसंपादन रद्द झाले. दरम्यान दैनिक लोकमतमधूनही पहिल्या पानावर या घोटाळ््यासंबंधीचे सिविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
बाबूश- विजयची एकत्र पत्रकार परिषद
सभात्याग केलेले आमदार विरोधी लॉबीत एकत्र आले. गृहनिर्माण महामंडळाच्या घोटाळ््याविषयी प्रश्न विचारलेले बाबूश मोन्सेरात आणि विजय सरदेसाई यांनी नंतर एकत्र पत्रकार परिषद घेऊन या कथित घोटाळ््याविषयी सविस्तर माहिती दिली. नेवरा येथे गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन संपादनासाठी सुरूवात करण्यात आली होती तेव्हा गृहनिर्माण महामंडळ आपल्याकडे होते आणि जेव्हा ही प्रक्रिया रद्दबातल ठरली गेली तेव्हा मनोहर पर्रीकर यांच्याजवळ ते खाते होते असे बाबूश यांनी सांगितले. एक जाणून बुजून केलेला मोठा घोटाळा असल्याचा दावा करून या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून तपास करण्याची मागणी त्यांनी केली. मडगाव गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात कॉंग्रेसचे नीळकंठ हळर्णकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तशीच कारवाई या प्रकरणातही करावी अशी मागणी सरदेसाई यांनी केली.