म्हापसा : कळंगुट पंचायत क्षेत्रातील अमली पदार्थ तसेच वेश्या व्यवसायासारख्या वाढत्या बेकायदेशीर प्रकारावर चिंता व्यक्त करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच येणा-या पर्यटकांना गैरप्रकारांपासून मुक्त ठेवण्यासाठी उपाय योजना हाती घेतली जात आहे. येणा-या पर्यटकांना चांगल्या प्रकारचे वातावरण लाभावे या हेतून पंचायतीकडून उपाय योजना हाती घेण्यात आली असून त्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. तसे आदेश पंचायतीने कळंगुट पोलिसांनासुद्धा दिले आहेत.
प्रसिद्ध अशा कळंगुट किनारपट्टीवर दर वर्षी लाखो संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत असतात; पण या व्यवसायाला जोडून अनेक गैरप्रकारही घडत असल्याने त्याचे विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असतात. त्यातून कळंगुटची तसेच पर्यटन व्यवसायाची नाहक बदनामी होत असते. त्यामुळे अशा गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचायतीच्या वतीने पावले उचलण्यात आली आहे. तशी मागणी पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून करण्यात आलेली. केलेल्या मागणीला अनुसरुन कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली.
पंचायत क्षेत्रात अनेक भिकारी, बेकायदेशीर गाईड्स, फिरते विक्रेते, बेकायदेशीर एजंट, यांच्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या नावावर त्यंची लुबाडणूक करतात. त्यांना फसवतात. पर्यटकांनी लुबाडणूक करण्याबरोबर हे लोक गैर व्यवसायात गुंतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पंचायतीकडून पोलिसांना करण्यात आली आहे.
फसवणुकी बरोबर काहीजण स्पा, मसाज पार्लर, वेश्या व्यवसाय, अमली पदार्थ सारख्या गैरप्रकारातही गुंतलेले असल्याचे आढळून आले आहेत. काही जण खंडणीसुद्धा वसूल करतात. विविध युक्त्या करुन लोकांकडून नाहक पैसे उकळतात. त्याचे परिणाम व्यवसायावर होत असल्याने गावाचे नाव खराब होत असल्याने ही उपाय योजना हाती घेण्यात आली असल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली.
परिसरातील शांततेवर परिणामकारक ठरणा-या या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी पंचायतीकडून कळंगुट पोलिसांना करण्यात आली आहे. पंचायत राज कायद्या १९९४ च्या कलम ११२ खाली अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी किंवा त्यांना अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या संबंधीचा ठरावही पंचायतीकडून काही दिवसापूर्वी घेण्यात आलेला.