पणजी : किना-यांवर पर्यटकांना उपद्रव करणा-या फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम सरकारने सुरु केली आहे. गुरुवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पर्यटन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन याबाबतीत काही आदेश दिले. बैठकीनंतर या प्रतिनिधीशी बोलताना मंत्री आजगांवकर म्हणाले की, भादंसंच्या कलम ३४ खाली अशा उपद्रवकारी विक्रेत्यांना थेट अटक करुन तुरुंगात टाकले जाईल. पोलिसांना या कामी पर्यटन खात्याचे वॉर्डन तसेच सुपरवायझरही मदत करतील. नाताळ, नववर्षानिमित्त देश, विदेशी पाहुण्यांची वर्दळ आता वाढणार आहे त्यामुळे किना-यांवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आलेली आहे. पोलिसांबरोबरच आयआरबीचे जवान तैनात केले जातील. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. भिकारी, फिरते विक्रेते पर्यटकांना त्रास देत असतात अशा तक्रारी नेहमीच ऐकू येतात. अलीकडच्या काळात काही विदेशी नागरिकही किना-यांवर स्टॉल्स लावून बेकायदा व्यवसाय करतात. हरमल किनाºयावर विदेशींचे असे अनेक बेकायदा स्टॉल्स आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत ड्रग्सना थारा दिला जाणार नाही. सरकार ईडीएमच्या विरोधात नाही परंतु तेथे ड्रग्सचा वापर करण्यास मात्र सक्त विरोध असल्याचे आजगांवकर म्हणाले. किनाºयांवरील शॅकमध्ये बाटल्यांचा वापर केला जाऊ नये. कॅनच वापरावेत, असा फतवा मध्यंतरी खात्याने काढला होता. त्याचीही सक्त अंमलबजावणी चालू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. किना-यांवर दारुच्या बाटल्या फोडून टाकण्याचे प्रकार घडतात. वाळूतून चालताना या बाटल्यांच्या काचा पायाला रुतण्याचा धोका असतो त्यामुळेच हा फतवा काढण्यात आला होता. दरम्यान, किनारा सफाईच्या बाबतीत मंत्री म्हणाले की, लवकरच या कामासाठी नव्या निविदा काढल्या जातील. त्यासंबंधीची प्रक्रिया चालू आहे. तूर्त हंगामी कंत्राटावरे हे काम चालू आहे. किनाºयावर कचरा दिसल्यास कोणीही वॉटसअपवर त्याचा फोटो पाठवल्यास २४ तासांच्या आत कचरा काढला जातो.दरम्यान, किना-यांवर पुरेशी प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या, सामान ठेवण्यासाठी लॉकर, पुरेशी पार्किंग व्यवस्था, किनाºयांवरील पर्यटनस्थळांचे सौंदर्यीकरण तसेच रोषणाई आदी प्रकल्प विचाराधीन असून प्रत्यक्ष फि ल्डवर इन्स्पेक्शन करुन ही कामे मार्गी लावली जातील, असे आजगांवकर यांनी स्पष्ट केले. आमदार आणि संबंधित पंचायतींना विश्वासात घेऊनच किनारी विकास आखण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जातील.आजगांवकर म्हणाले की, किनारी आमदारांनी आपापल्या भागातील पर्यटनविषयक अनेक समस्या याआधी मांडलेल्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न राहील. प्रसाधनगृहांची वगैरे पक्की बांधकामे केली जातील. सरकारकडे निधीची कमतरता नाही.