पणजी : गोव्यात लोह खनिज उत्खनन १३ मार्च रोजी बंद करण्यात यावे तसेच १४ पासून खनिज वाहतूक बंद करावी आणि खाणींवरील सर्व मशिनरी १५ मार्च रोजी दुपारी १ वाजेपर्यंत हलवावी, असे आदेश खाण खात्याने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ८८ खाण लीज रद्द करुन सर्व लिजांचा लिलांव करण्याचा जो आदेश दिला आहे त्या पार्श्वभूमीवर खात्याने ही पावले उचलली आहेत. खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी खात्याचे सर्व उपसंचालक, तांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.
लीजांच्या तपासणीसाठी चार पथके दुस-यांदा नूतनीकरण होऊन कार्यरत असलेल्या आणि कार्यरत नसलेल्या लीजांच्या तपासणीसाठी चार पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने काल मंगळवारी काही खाणींवर प्राथमिक तपासणीही झाली. खाणींच्या ठिकाणी असलेला खनिजमाल नव्याने उत्खनन करुन काढलेला आहे की इ लिलांवाचा अथवा जुना डंप आहे याचा तपशीलही अधिकारी नोंदवून घेणार आहेत. या खनिजमालाचे फोटो काढले जाणार आहेत. सर्व खाण लीजधारकांनी खाणींच्या ठिकाणी फलकावर हा माल नव्याने केलेल्या उत्खननाचा आहे, इ लिलांवाचा आहे की टाकाऊ डंप याचा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे. येत्या १0 मार्च रोजी खाण अधिकारी तपासणीची ही प्रक्रिया पूर्ण करतील. कार्यरत नसलेल्या खाणींचीही पाहणी आज ७ पासून सुरु होईल. चालू आणि बंद असलेल्या दोन्ही प्रकारच्या खाण लीजांचा दैनंदिन अहवाल तयार केला जाईल. या व्यतिरिक्त खनिज उत्खनन, वाहतूक यावर स्वतंत्र देखरेख ठेवली जाणार आहे.
१३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खनिज उत्खनन बंद करावे लागेल. १४ रोजी सायंकाळी ६ वाजता खनिजमालाची वाहतूक बंद करावी लागेल. रॉयल्टी भरलेल्या मालाचीच स्टॉकयार्ड किंवा जेटीवरुन त्यानंतर वाहतूक केली जाऊ शकते. १५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत खाणींवरील मशिनरी न हलविल्यास केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या बंगळुरु कार्यालयातील अधिकारी अथवा विभागीय खाण नियंत्रक यांना निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार असेल.
- सर्व लिजांची तपासणी खाण खात्याचे तांत्रिकी विभागाचे अधिकारी स्वतंत्रपणे किंवा इंडियन ब्युरो आॅफ माइन्स, खाण सुरक्षा संचालनालय, वन खाते, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी यांच्याबरोबर १५ मार्च रोजी दुपारी १ नंतर संयुक्तपणे करणार आहेत. - कार्यरत असलेल्या लीजांच्या ठिकाणी असलेला इ लिलांवाच्या मालाची वाहतूक आज ७ पासून बंद करण्याचे निर्देश दिलेले असून येत्या १६ पर्यंत ती बंद राहील नंतर आवश्यक त्या उपाययोजना घेतल्यानंतरच परवानगी दिली जाईल.
- १५ मार्चपासून खाणी लिलांचा लिलांव होईपर्यंत बंद होणार असल्याने खाणींवरील खनिजमाल अक्षरक्ष ओरबाडून नेण्याचे काम गेले काही दिवस खाणपट्ट्यात चालू होते. खनिज वाहतूक करणा-या ट्रकांची संख्याही बेसुमार वाढली होती. ‘लोकमत’ने या प्रकाराला वाचा फोडली होती.