पणजी: विशेष मुलांचा वर्ग पुन्हा तळमजल्यावर हलविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने पणजी येथील पीपल्स हायस्कूलला दिला आहे. दिवाळी सुट्टीनंतर सुरू होणारे वर्ग तळमजल्यावर सुरू केले जातील याची खबरदारी घेण्यास न्यायायाने सांगितले आहे.
या हायस्कूलने तळमजल्यावरील विशेष विद्यार्थ्यांचा वर्ग पहिल्या वर्गावर नेला होता. विशेष मुलांसाठी ते त्रासदायक ठरत असल्याचा दावा करून विद्यालयाच्या पालकांनी या प्रकरणात शिक्षण खात्याकडे तक्रार केली होती. शिक्षण खात्याने हा विषय विशेष मुलांसंबधीच्या खात्याच्या आयुक्तांकडे सोपविला होता. आयुक्ताने हायस्कूल व्यवस्थापनाला आदेश जारी करून पहिल्या मजल्यावर नेलेला वर्ग तळमजल्यावर नेण्याचा आदेश दिला होता.
आयुक्ताच्या आदेशाची अंमलबजावणी हायस्कूल व्यवस्थापनाने न केल्यामुळे पालकांनी खंडपीठाकडे हे प्रकरण नेले. एका सुनावणी दरम्यान खंडपीठाने आयुक्ताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश हायस्कूल व्यवस्थापनाला दिला होता. परंतु व्यवस्थापनाने आयुक्ताच्या आदेशाला आव्हान देत असल्याचे खंडपीठाला सांगितले होते. गुरुवारी याप्रकरणात निवाडा सुनावताना खंडपीठाने विशेष विद्यार्थ्यांचा वर्ग तळमजल्यावर आणण्याचा आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी करून दिवाळीच्या सुट्टी नंतर त्याची माहिती खंडपीठाला देण्यात यावी असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीत भरणारे वर्ग हे तळमजल्यावर भरतील अशी अपेक्षा पालकांना आहे.