पणजी : गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने एनेबल इंडियाच्या सहकार्याने कला, पुरस्कार आणि उद्योजकता विकास यांच्या माध्यमातून न्युरोडायव्हर्सिटीचे सक्षमीकरण करण्यासाठी समावेशक प्रयत्न राबवण्याच्या उद्देशाने गोवा राज्य केंद्र हा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे. सर्वसमावेशक समाजाला चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करणे आणि सर्वांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम कटिबद्ध आहे.
'समावेशक मोहीम'हा उपक्रम जागरुकता आणि संवेदनशीलता, सार्वजनिक ठिकाणी प्रवेशसुलभता, व रोजगार संधीतून सक्षमीकरण या तीन व्यापक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून गोवा संग्रहालयामध्ये या उपक्रमाच्या शुभारंभी कार्यक्रमामध्ये विविध सत्रे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने चित्रपट प्रदर्शन, पालक संवाद, कलाकृतीवर चर्चासत्र यांचा समावेश आहे.
आम्ही गोवा राज्य केंद्राच्या सहकार्याने 'समावेशक मोहीमे'द्वारे अन्न निर्मिती क्षेत्रामधील विविध कामांसाठी आवश्यक तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स अशा रोजगार कौशल्यांच्या विकासासाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण देऊन दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. नामांकित संस्था, आस्थापनांमध्ये इंटर्नशिप तसेच नोकरीची संधी उपलब्ध करत आम्ही प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कार्यानुभव यातील तफावत दूर करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले.