पणजी: अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक श्री राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे "प्रबोधनात्मक श्री राम ज्योती" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता, पर्वरी येथील एससीईआरटी इमारती समोरील, सर्व्हिस रोड येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर सन्मानिय पाहूणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानवडे, उपसभापती जोशुआ डिसोझा, जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, आमदार केदार नाईक, पेन्हा दि फ्रांन्सच्या जि.पं. सदस्य कविता गुपेश नाईक व सरपंच स्वप्नील चोडणकर व इतर मान्यवरांची उपस्थिती असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हा सण दिवाळीसारखा साजरा करूया" असे आवाहन केले होते. या अनुषंगाने, राज्य सरकारने या नेत्रदीपक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सुमारे १५० विद्यार्थी श्लोक, राम स्तोत्रांच्या जप आणि गंगा आरतीप्रमाणेच आरती करून होईल. अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव निर्माण करण्यासाठी विशेष दिंडी प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. स्तोत्रांचे सामूहिक पठण सायम प्रार्थनाकडे जाण्यापूर्वी एक आध्यात्मिक वातावरण तयार करेल. या अध्यात्मिक क्षणांनंतर, समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणारी रामायणावर आधारित शास्त्रीय नृत्ये रंगमंचावर सादर करण्यात येतील. श्री राम गजर यांच्या दिंडीचे सादरीकरण, भक्तांकडून १००० 'दिव्यांची' रोषणाई करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सांगता महाआरतीने होईल, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.
श्रीराम मंदिराच्या या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आणि एकात्मिक भावनेच्या नेत्रदीपक सायंकालीन महोत्सवात मोठ्या संख्येने सामील व्हा, असे आवाहन पर्यटन खात्यातर्फे करण्यात आले आहे.