लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला 'स्वयंपूर्ण गोवा' हा स्तुत्य असा उपक्रम असून केवळ गोवाच नव्हे तर देशाला देखील दिशा दाखवत आहे. अन्य राज्यांनीही याच धर्तीवर स्वयंपूर्ण होण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत 'आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा' अंतर्गत कृषी व ग्रामीण विकास योजनांच्या लाभार्थ्यांशी साधलेल्या ऑनलाइन परिसंवादावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार गोव्याला सहकार्य करत आले आहे. यापुढेही असेच सहकार्य राहील. गोवा हे लहान राज्य असले तरी त्यांनी कृषी नव्हे तर अन्य क्षेत्रातही मोठा विकास साधला असून ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा 'स्वयंपूर्ण गोवा' संकल्पनेचे कौतुक करीत आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली भारत निर्माण होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येय पंतप्रधानांनी समोर ठेवले असून त्यांनी केवळ ही घोषणाच केली नसून त्याचा रोडमॅपही तयार केला आहे. केंद्र सरकारचे कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय नेहमीच गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून नेहमीच सहयोग असेल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, खाजन शेतीचे व्यवस्थापन करणे, कृषी पर्यटनाला चालना देणे आदी विविध उपक्रम गोवा सरकारने राबवले आहेत. हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. कृषी कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आता केंद्रातून 'लखपती दिदी या योजनेला गती दिली जाईल, असे चौहान यांनी सांगितले. कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय नेहमीच गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून नेहमीच सहयोग असेल, असे त्यांनी सांगितले.
'कौशल्य विकास'चा लाभ होतोय : मुख्यमंत्री
भाजप सरकारने गोव्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम तरुणांना एका वर्षाच्या कार्यक्रमात नाव नोंदणी करण्याची संधी देतो. यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच प्रमाणपत्रही मिळते. सरकारी किंवा कॉर्पोरेट नोकऱ्यांसाठी अर्ज करताना या प्रमाणपत्राचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सेंद्रीय शेतीला प्राधान्य द्या
शेतीमध्ये पिकणाऱ्या फळे, भाज्यांवर रसायनिक फवारणीमुळे जमीन धोक्यात येत आहेच. शिवाय लोकांचे आरोग्यही संकटात सापडले आहे. रासायनिक खतांमुळे कॅन्सर सारखा आजार पसरत आहे. यामुळे केंद्र सरकारने आता सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत गोमुत्र, गोबर यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर शेतीसाठी करता येईल, असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सांगितले.