लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघात कॉग्रेस आपली परंपरा कायम ठेवून अल्पसंख्याकाला जर तिकीट देत असेल, तर त्याला माझी मुळीच हरकत नाही. मी माघार घ्यायला तयार आहे', असे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत चोडणकर एका प्रश्नावर म्हणाले की, मी दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे. मी तिकिटासाठी इच्छुक आहे. परंतु पक्षाने नेहमीच या मतदारसंघात अल्पसंख्याकांमधील नेत्याला उमेदवारी दिलेली आहे. हे धोरण कायम ठेवून, जर का अल्पसंख्यांक उमेदवाराचे नाव पक्ष नेतृत्त्वाच्या विचाराधीन असेल, तर त्याला माझी हरकत नाही. पक्ष जो उमेदवार देईल, त्याला मी पाठिंबा देईन.'
गिरीश पुढे म्हणाले की, 'काँग्रेसने नेहमीच अल्पसंख्यांक तसेच ओबीसी, एसटी समाजाला प्रोत्साहन दिलेले आहे. दक्षिणेत अल्पसंख्यांक उमेदवार जर पक्ष देत असेल, तर मी अडथळा बनून राहणार नाही, पक्षाचा निर्णय मान्य करून संबंधित उमेदवारासाठी काम करीन.'
आमचेही उमेदवार सक्षम
चोडणकर म्हणाले की, उत्तर गोव्यात अॅड. रमाकांत खलप, विजय भिके तसेच राजन घाटे, संजय बर्डे, अनंत पिसुर्लेकर हेही सक्षम उमेदवार आहेत. खलप यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. भिके यांचे पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून लक्षणीय काम आहे. आमचे इतर उमेदवारही सक्षम आहेत.'
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली
चोडणकर एका प्रश्नावर म्हणाले की, 'पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने मला पणजी मतदारसंघात पर्रीकर यांच्याविरोधात उमेदवारी मला कोणीही खरेदी करू शकणार नाही किंवा कोणाचा दबावही मी सहन करून घेणार नाही, हे पक्ष नेतृत्त्वाला माहीत होते. त्यामुळे उमेदवार म्हणून मला निवडले. त्यावेळी पणजीत काँग्रेस गट समितीही अस्तित्त्वात नव्हती. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून मी निवडणूक लढवली. परंतु आता मला उत्तर गोव्यातून रिंगणात उतरायचे नाही. कारण माझे कार्यक्षेत्र दक्षिण गोवा आहे.'
नावे लवकरच होणार जाहीर
दक्षिण गोवा मतदारसंघात चोडणकर यांच्यासह विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, कॅप्टन विरियातो फर्नाडिस, दीपकुमार मापारी, पावसिलिन दोरादो, उलारिक रॉड्रिक्स व इतर दोन मिळून आठजणांनी अर्ज सादर केले आहेत. प्रदेश निवडणूक समितीकडून नावे छाननी समितीकडे पाठवली जातील. तेथून ही नावे केंद्रीय निवडणूक समितीकडे जातील व केंद्रीय समिती उमेदवार जाहीर करणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना महिना अखेरपर्यंत उमेदवार जाहीर होऊ शकतो, असे स्पष्ट केलेले आहे.