लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: राज्यात जगभरातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरच मोठमोठे प्रकल्प, पंचतारांकित हॉटेल्स व इतर पूरक व्यवसाय गोव्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, त्यासाठी मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यामुळे गोमंतकीय तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे, अन्यथा या होणाऱ्या नोकऱ्या परप्रांतीय बळकावतील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
फर्मागुडी येथील पीईएस महाविद्यालयात गुरुवारी टाटा कौशल्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृषिमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, वेलिंग सरपंच हर्षा गावडे उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर'च्या माध्यमातून नवभारताचे जे स्वप्न पाहिले आहे, ते साध्य करण्यासाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम गरजेचे आहेत. त्यासाठीच आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत असताना कौशल्यपूर्ण संसाधनांना प्राधान्य देत आहोत.
गोवा देशाची पर्यटन राजधानी बनेल
पर्यटन व आतिथ्य उद्योगक्षेत्रात जेवढ्या संधी गोव्यात आहेत, तेवढ्या संपूर्ण भारतात कुठेच नाहीत. आज ज्या पद्धतीने गोव्यात पर्यटन उद्योगात साधनसुविधांची निर्मिती होत आहे, ते पाहता आगामी काळात गोवा देशाची पर्यटन राजधानी बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
१५ जुलैपर्यंत १० जणांना प्रशिक्षणार्थी उपक्रमाचा लाभ
१ केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रशिक्षणार्थी कार्यक्रम पुन्हा एकदा राबवण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कौशल्य विकास अॅपची निर्मिती झाली आहे. युवकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. सदर कार्यक्रमांतर्गत १५ जुलैपर्यंत २ किमान १० हजार युवकांना द सुविधांचा लाभ आम्ही देणार असून, यासाठी खासगी कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनांचा अंमल करणारे गोवा हे पहिले राज्य आहे.