पणजी : घराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवून चोरांना खुले आमंत्रण दिल्यानंतर चोरटे अशी संधी थोडीच सोडणार आहेत. असाच प्रकार ताळगाव येथील महिलेच्या बाबतीत घडला. डेबिट कार्डचा क्रमांक देण्यापासून सर्वात अभेद्य पासवर्ड मानला जाणारा ओटीपीही (वन टाईम पासवर्ड) या महिलेने देऊन टाकला. परिणामे तिला २५ हजारांना गंडविण्यात आले. या महिलेने पणजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ८४३४३२१५२३ या क्रमांकावरून अज्ञाताकडून तिला फोन आला. आपण ओरियंटल बँक आॅफ कॉमर्समधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. एटीएम कार्डचे नूतनीकरण करायला हवे असे सांगून कार्डचा क्रमांक विचारला. त्या महिलेने तो देऊन टाकला. आता कार्डाचे नूतनीकरण होत आहे, त्यामुळे तुम्हाला मोबाईलवर ओटीपी मिळेल, तो आपल्याला सांगा असे त्याने सांगितले. मागचा पुढचा विचार न करता त्या महिलेने एसएमएसद्वारे आलेला ओटीपी देऊन टाकला. दुसऱ्या बाजूने फोन ठेवण्यात आला आणि काही क्षणात तिच्या खात्यातून २४९९० रुपये कमी झाल्याचा एसएमएस तिला आला. आपल्याला फसविण्यात आल्याचे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर त्यांनी पणजी पोलीस स्थानकात या प्रकरणात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन देसाई यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून ते तपास करीत आहेत. ओटीपी हा आॅनलाईन व्यवहारात अत्यंत अभेद्य असा पासवर्ड मानला जात आहे; कारण तो ऐनवेळी आणि तात्पुरता दिलेला असतो. त्याची वैधता काही मिनिटांपर्यंतच असते तसेच केवळ एकाच व्यवहारापुरती मर्यादित असते. नंतर तो आपोआप निष्प्रभ होतो; परंतु हा ओटीपीही या भामट्याने महिलेला फसवून सहज मिळविला. फोनवरून बँक खात्यांची आणि एटीएम व क्रेडिट कार्डविषयक माहिती देऊ नका, असे सल्ले आणि सूचना वारंवार बँका आणि पोलिसांकडून दिल्या जात असतानाही लोक या गोष्टी गांभीर्याने घेतल्या जात असल्याचे दिसत नाही. (प्रतिनिधी)
भामट्याला ओटीपीही देऊन टाकला
By admin | Published: April 20, 2016 1:50 AM