पणजी : काँग्रेसचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर हे काँग्रेस पक्षाबाहेरील शक्तीच्या प्रभावाखाली आलेले आहेत. त्यामुळे त्यांना अचानक कंठ फुटला, अशा शब्दांत मगोपच्या नेत्यांनी शुक्रवारी हळर्णकर यांना प्रत्युत्तर दिले. थिवीतील पाणी पुरवठय़ाच्या विषयावरून हळर्णकर यांनी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर दोनवेळा टीका केली होती.
शुक्रवारी मगोपचे कार्याध्यक्ष नारायण सावंत, सचिव रत्नकांत म्हादरेळकर आणि प्रताप फडते यांनी येथे मगोपच्या कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. हळर्णकर हे निष्क्रीय आहेत. त्यांनी थिवीतील पाणी पुरवठाविषयक कामासाठी एकही प्रस्ताव बांधकाम खात्याला सादर केला नाही. या उलट दयानंद नाव्रेकर, सदानंद शेट तानावडे आणि किरण कांदोळकर हे थिवीचे आमदार असताना त्यांनी पाणी पुरवठा व्यवस्थेशी निगडीत अनेक कामे थिवीत करून घेतली. हळर्णकर हे स्वत:चे अपयश लपविण्यासाठी मंत्री ढवळीकर यांच्यावर टीका करत आहेत, असे सावंत म्हणाले.
थिवीमध्ये बांधकाम खात्याने पाणी पुरवठाविषयक किती कामे यापूर्वी केली आहेत याची यादी सावंत यांनी सादर केली. आम्हाला सरकारने ही यादी दिली. बांधकाम खात्याकडे हळर्णकर यांचा एकही प्रस्ताव निर्णयावीना राहिलेला नाही. त्यांनी प्रस्तावच दिलेला नाही. प्रस्ताव असल्यास तसे जाहीर करावे, असे फडते म्हणाले. रिव्हर प्रिन्सेसचे भंगार कुठे विकले व घोगळ येथील जमीन रुपांतरणाचे पुढे काय झाले ते हळर्णकर यांनी सांगावे, असे आव्हान फडते यांनी दिले. हळर्णकर यांची अजुनही तपास यंत्रणोकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी ढवळीकर यांना सल्ले देऊ नयेत. ढवळीकर यांना कधी कोणत्या चौकशीला सामोरे जावे लागले नाही, असे फडते म्हणाले. हळर्णकर हे कुणाच्या सांगण्यावरून तोंड उघडत आहेत याचा शोध मगो पक्ष घेत आहे, असेही ते म्हणाले. शौचालये बांधण्यासाठी सरकारने पंचायती व पालिकांना निधी दिला आहे. आता हे काम बांधकाम खात्याच्या ताब्यात येत नाही. हळर्णकर यांनी सरकारी कामकाजाचे नियम समजून घेतले असते तर त्यांना वर्षभरापूर्वी झालेला हा नियम कळला असता, असे सावंत म्हणाले.