म्हापसा - मागील दोन वर्षांपासून पर्यटन खात्याकडे व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजनाचा अभाव असल्याने या वर्षी पर्यटकांचे प्रमाण घटण्यास कारणीभूत ठरले असल्याचे मत गोव्याच्या दोन माजी पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. या वर्षी नाताळ तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या किमान ५० टक्क्यांनी घटल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन हंगामाच्या काळात पर्यटकांनी पाठ फिरवली तर पुढील हंगाम कशाप्रकारे काढावा असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. केरळ राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर गोव्यात येणारे पर्यटक वाढतील या असलेल्या अपेक्षेचा भंग झाल्याचे घटलेल्या संख्येतून दिसून आलेले आहे.
माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांना घटलेल्या पर्यटकांच्या संख्येसंबंधी विचारले असताना खात्यात नियोजनाचा अभाव संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे ते म्हणाले. राज्यात सर्वात जास्त प्रमाणावर महसूल प्राप्त करुन देणाऱ्या या उद्योगाकडे नियोजनाच्या अभावी मागील दोन वर्षांपासून दुर्लक्ष केले गेल्याने परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली.
विदेशी पर्यटकांना घेवून येणाऱ्या चाटर्ड विमानांचे प्रमाण किमान ४० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. गोवा हा ब्रँड कायम ठेवताना त्यातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्या नव्या ठिकाणी रोड शोचे आयोजन होणे गरजेचे असते. त्यावर सुद्धा दुर्लक्ष केले गेल्याने परिणाम जाणवल्याची माहिती सुद्धा दिली. रोड शोचे व्यवस्थित आयोजन केल्यास संख्या नक्कीच वाढणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यमान आमदार तथा माजी पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी नियोजनाबरोबर फॉर्मेलिन तसेच इतक वादग्रस्त प्रश्न हाताळण्यास सरकारला आलेले अपयश व्यवसायाच्या दृष्टीने परिणामकारक ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येणारे पर्यटक पर्यटनासोबत मासळीच्या निमित्ताने येत असतात; पण मासळीतील फॉर्मेलिनचा प्रश्न हाताळून त्यावर तोडगा काढणे सरकारला न जमल्यानेही व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली.
किनाऱ्यांवर साचलेल्या कचऱ्याचे परिणाम विदेशी पर्यटकांचे प्रमाण कमी होण्यास आणखीन एक कारण ठरल्याचे हळर्णकर म्हणाले. मागील वर्षभरात पर्यटकांना झालेली मारहाण, त्यांच्यावरील अत्याचार, त्यांची वाहने अडवून केली जाणाऱ्या सतावणुकीतून यातून गोव्याचे नावही काही प्रमाणावर बदनाम झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. गोव्यात येणाºया पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जाते. पर्यटनस्थळावर प्रवेश केल्यापासून ते तेथून पुन्हा माघारी जाईपर्यंत प्रत्येक ठिकाणी लुबाडणूक केली जात असल्याने येणाऱ्या पर्यटकांवर परिणामकारक ठरल्याचे हळर्णकर म्हणाले. आणलेल्या वाहनाने पार्किंग करण्यापासून ते विविध प्रकारच्या खाद्य तसेच पेयावर लावले जाणारे भरमसाठ दर पर्यटकांवर परिणामकारक ठरले आहेत. विद्यमान परिस्थिती पाहता या व्यवसायाला पुन्हा मार्गी लावण्यासाठी नियोजनावर भर देणे तसेच इतर अनेक उपाय योजना हाती घेण्याची गरज या दोन्ही माजी मंत्र्यांनी बोलताना व्यक्त केली. योग्य वेळी उपाय योजना न केल्यास ते हानीकारक ठरण्याची भीती सुद्धा व्यक्त केली आहे.