पणजी - अलीकडच्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या बाबतीत सर्वात कटू अनुभव यंदाच्या हंगामात येथील व्यावसायिकांना आला. शॅकमालक, हॉटेलवाले, टॅक्सीचालक सर्वजण या हंगामात तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक पर्यटक घटल्याची तक्रार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनेही हॉटेलभाडे नियंत्रणात आणण्यासाठी पर्यटन व्यापार कायद्यात दुरुस्तीचा विचार चालवला आहे.
गोवा हे महागडे डेस्टिनेशन ठरत असल्याने विदेशी पर्यटक श्रीलंका, मलेशिया तसेच तुलनेत अन्य स्वस्त ठिकाणी वळू लागले आहेत. चार्टर विमानांची संख्या निम्म्याहून कमी झालेली आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर म्हणाले की, काही हॉटेल्स भरमसाट खोली भाडे आकारत असल्याची माहिती मला मिळालेली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. खोली भाडेदराचा आढावा घेण्यासाठी लवकरच तारांकित हॉटेलांच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली जाईल.
दरम्यान, रशियन पर्यटकांची संख्याही लक्षणीय घटत चालली आहे. पेगास टुरिस्टिक या बड्या रशियन टूर आॅपरेटर कंपनीने या हंगामासाठी येत्या 12 तारखेपासून गोव्यातील चार्टर विमाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी दरवर्षी सुमारे 300 चार्टर विमाने गोव्यात आणत असे. यंदाच्या हंगामात गोव्यातील चार्टर व्यवसायात मोठे नुकसान सोसावे लागल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
धोरण ठरविण्यासाठी 16 तारखेला बैठक
पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी सर्वसमावेशक पर्यटन धोरण तयार करण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. गोव्याचा पर्यटन हंगाम साधारणपणे आॅक्टोबरपासून सुरू होतो. पुढील पर्यटन हंगामाआधी पर्यटन धोरण तयार करण्याचे प्रयत्न चालले आहे. मंत्री आजगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आमदार तसेच हॉटेलमालक, शॅकवाले, टुरिस्ट टॅक्सीचालक आदी संबंधित घटकांची बैठक येत्या 16 तारखेला बोलावण्यात आली आहे.
कळंगुटचे सरपंच तथा हॉटेल व्यावसायिक शॉन मार्टिन म्हणाले की, यंदा देशी पर्यटकांची संख्याही घटली त्यामुळे लहान गेस्ट हाउसनाही ग्राहक मिळाले नाहीत. सनबर्न, सुपरसोनिकसारखे इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल गोव्यात बंद झाल्याने त्याचाही हा परिणाम असावा.