पणजी: आगामी वर्षात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये गोव्याचाही (Goa Election 2022) समावेश आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. भाजप, काँग्रेस यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी चर्चा आहे. यातच शिवसेनाही ताकदीने उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच राजकीय रणधुमाळी पाहता गोव्यातील निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) गोवा दौऱ्यावर आहेत. पी. चिदंबरम यांनी पणजीत गोव्यातील निवडणूक अभियान कार्यालयाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना, गोव्यात जो पक्ष जिंकतो, तो लोकसभा निवडणुकीतही विजयी होतो. मात्र, काँग्रेस दोन्ही ठिकाणी नक्कीच बाजी मारेल, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.
पणजी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पी. चिदंबरम म्हणाले की, इतिहास साक्षीदार आहे. गोवा जो जिंकतो, तो दिल्लीही जिंकतो. सन २००७, २००९ वेळच्या निवडणुकांमध्ये गोव्यात काँग्रेसचा विजय झाला होता आणि केंद्रीय निवडणुकांमध्येही या कालावधीत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. दुर्दैवाने सन २०१२ मध्ये गोवा काँग्रेसच्या हातून निसटले आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, असे चिदंबरम म्हणाले.
आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस बाजी मारेल
मागील गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये गोव्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, तरीही सत्ता स्थापन करण्यात आपण असमर्थ ठरलो. आता मात्र इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. आत्मविश्वासाने कार्य करत पुन्हा एकदा गोवा जिंकण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष गोव्यातील आगामी निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकाही जिंकेल, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला आहे.
दरम्यान, गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष (टीएमसी) विधानसभा निवडणुका पूर्ण शक्तीने व क्षमतेने लढविणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही मुख्यमंत्रीपदासाठीचा आमचा उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रीय ख्यातीचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी खास ‘लोकमत’ला सांगितले. किशोर हे गोवा भेटीवर असताना ‘लोकमत’चे गोवा निवासी संपादक सदगुरू पाटील यांनी किशोर यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.