पणजी - गोव्यातील सिनेमागृह मालक संघटनेने पद्मावत चित्रपट गोव्यात दाखविणार नाही असा निर्णय घेतला असल्याने जे पद्मावत चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांची निराशा झाली आहे. या निर्णयाला गोमंतकीयांनी तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी विरोध केला आहे. काही सिनेमागृहांमध्ये मात्र पद्मावत प्रदर्शित केला जात असल्याचे माहिती मिळाली.
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान बरोबर गोव्यात सुध्दा पद्मवात प्रदर्शित न केल्याने गोमंतकीयांकडून अनेक माध्यमांतून निषेध होत आहे. सोशल मिडीया साईट्वर तर पद्ममावत गोव्यात प्रदर्शीत न केल्याने अनेक विनोद, विरोध व निषेधाचे पोस्ट केलेले दिसत आहेत. प्रत्येक विचारांची कदर करणा-या व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मान देणाºया गोवा सारख्या राज्यात अशा तºहेचे बंद कधीच अनुभवायला न आल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वास्कोतील १९३० या सिनेमागृहात व फोंडा येथील कार्नव्हाल सिनेमा या सिनेमामध्ये पद्मावत प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्या सिनेमागृहामध्ये चित्रपट दाखविण्यात येत आहे तेथे तीन दिवसाचे आदीच तिकीट बुकींग झालेले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पद्मावत प्रदर्शित झालेल्या या सिनेमागृहांच्या ठिकाणी पोलिसांची कडक बंदोबस्त आहे. पणजी येथील सम्राट अशोक झी स्क्वॅर सिनेमागृहात पद्मावतचा फलक मारला असून भरपूर लोक येथे विचारपूस करून जात आहेत. पण येथे चित्रपट प्रदर्शित केला नाही. हा फलक महिना अगोदरच मारला होता असे येथे काम करणा-या कर्मचा-यांनी सांगितले.
काही लोकांचा पद्मावत चित्रपटाला विरोध असून अखिल गोवा थेटर्स मालक संघटनेने हा चित्रपट सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी व आमदार प्रविण झांटये यांनी सांगितले. या अंतर्गत गोव्यातील १८ ते २० सिनेमागृहांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेने मिळून हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
पद्मावत चित्रपट पाहून देशद्रोह होत असेल तर मी हा देशद्रोह करणार आहे. गोव्यात कधी नव्हती ती दुदैवी परिस्थीती आली आहे. गोव्यातील सिनेमागृहामध्ये जर हा चित्रपट दाखविला जात नसेल तर बेळगांव मध्ये संपूर्ण कुटुंबाला घेऊन जाऊन पद्मावत बघणार. आपल्या नावावर एक देशद्रोह झाला तरी हरकत नाही.
- ज्ञानेश मोघे- चित्रपट दिग्दर्शक
सर्वोच्च न्यायालयाचा पद्मावत चित्रपट दाखविण्याचा आदेश आहे. तसेच सेन्सर बोर्डने सुध्दा या चित्रपटातील आक्षेपार्ह्य सीन्सनां कातरी लावण्यात आली आहे तसेच चित्रपटाचे नाव सुध्दा बदलण्यात आले आहे. हा चित्रपट बघल्यास काहीही राष्ट्रदोह वैगरे होणार नाही. न्यायालय व सेन्सर बोर्डने हिरवा कंदील दाखविलेल्या या चित्रपटाला अशा तºहेचा बंद निषेधार्ह्र आहे.
- धर्मानंद वेर्णेकर- चित्रपट दिग्दर्शक