लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धेपे गोव्यातील सर्वांत मोठे उद्योग घराणे. या कुटुंबातील सून पल्लवी धेपे आयुष्यात प्रथमच आता लोकसभा निवडणूक लढवत आहे. पल्लवी यांचा मार्ग खडतर असून त्यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कडवी झुंज सुरू आहे.
दक्षिण गोव्यात एकूण ५ लाख ९८ हजार ९३४ मतदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गोव्यात महिला उमेदवारच हवा, अशी सूचना केल्यानंतर भाजपने पल्लवी यांना तिकीट दिले. गेले पंधरा दिवस पल्लवी धेपे पूर्ण दक्षिण गोव्यात फिरत आहेत. दक्षिणेची जागा तूर्त काँग्रेसकडे आहे. फ्रान्सिस सार्दिन यांनी लोकसभेत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधीत्व केले. त्यांना काँग्रेसने यावेळी उमेदवारी दिलेली नाही. पल्लवी यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे कॅप्टन विरियातो फर्नाडिस हे लढत आहेत. विरियातो देखील प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. २०२२ साली विधानसभा निवडणुकीत विरियातो पराभूत झाले.
इंडिया आघाडीने विरियातो यांच्या प्रचाराला धार आणली आहे. मात्र, भारतीय राज्यघटना गोव्यावर लादली गेली, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर विरियातो है टिकेचे धनी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विरियातो यांच्यावर टीका केली.
काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नाडिस हे भारतीय घटनेच्या विरोधात वक्तव्ये करीत असल्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे व पोलिसांतही तक्रार. घटनेच्या विषयावर सार्वजनिक चर्चेसाठी आपण तयार असल्याचे विरियातो यांचे भाजप नेते तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आव्हान. गोवा हे वेगळे राज्य असून, या राज्यातील जल, जंगल, जमीन आणि अस्मिता राखण्यासाठी प्रादेशिक पक्ष निवडा, असे आरजीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांचे आवाहन. दक्षिण गोव्याची जागा जिंकण्यासाठी भाजपकडून दि. २७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
हे ठरताहेत प्रचाराचे मुद्दे
मोदी सरकारची विकासकामे, केंद्र सरकारची भ्रष्टाचारविरोधी कारवाई, गोव्यातील नागरिकांसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी, गोव्याला खास दर्जा देण्याचा आग्रह, वाढती महागाई व बेरोजगारी.