लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धंपे यांनी गुरुवारी (दि. ११) सकाळी चिखली येथील नरसिंह सातेरी देवस्थानात उपस्थिती लावून देवी- देवतांचा आशीर्वाद घेत तेथे आरती केली.
दक्षिण गोव्यातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी दक्षिण गोव्यात कार्यालय सुरू करण्याची माझी इच्छा असून, ती मी नक्कीच पूर्ण करणार असल्याचे पल्लवी धेपे यांनी दाबोळी मतदारसंघात मतदारांच्या भेटीसाठी आल्या असता सांगितले.
पल्लवी धेपे सकाळी चिखली येथील नरसिंह सातेरी देवस्थानात आल्या असता तेथे शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती. तसेच त्यांच्याबरोबर मंत्री आणि दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष संदीप सूद, नगरसेवक विनोद किनळेकर, मुरगावचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पल्लवी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धंपे यांचा गुरुवारी सकाळ- पासून दाबोळी मतदार- संघात दौरा होता. सकाळी त्या दाबोळीत पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम चिखली येथील नरसिंह सातेरी देवस्थानात भेट देऊन सातेरी देवीचा आशीर्वाद घेतला. तसेच त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
लोकांशी साधला संवाद
पल्लवी धेपे यांनी वाडे येथील सुशीला सी विड्स रहिवासी वसाहतीत जाऊन तेथील लोकांशी संवाद साधून त्यांच्या असलेल्या विविध अपेक्षा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी दाबोळी येथे असलेल्या दाबोळीचा राजा मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्ते आणि मतदारांशी तेथे आयोजित केलेल्या सभेद्वारे संवाद साधला. त्यानंतर त्यांनी दाबोळी मतदारसंघात राहणाऱ्या काही प्रामाणिक लोकांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी समाज कल्याण विषयावर संवाद साधला.
त्यानंतर संध्याकाळी चिखली येथील जॉगस पार्कमध्ये त्यांनी इतर मान्यवरांबरोबर उपस्थिती लावून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच नवेवाडे येथील 'लास्ट स्टॉप' परिसरात जाऊन तेथील लोकांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. नंतर रात्री बोगमाळो येथे कोपरा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांचे मार्गदर्शन करणारे भाषण झाले.