लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जागा रिकामी करून देण्यासाठी बुधवारी सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आमदारकीचा राजीनामा सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केला. त्यामुळे पर्रीकर पणजी मतदारसंघातूनच पोटनिवडणूक लढवतील हे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही पोटनिवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर आम आदमी पक्षानेही रिंगणात उतरण्याचे इरादे पक्के केले आहेत.कुंकळयेकर यांच्यासह कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनीही पर्रीकर यांच्यासाठी आमदारकी सोडण्याची तयारी दर्शविली होती; परंतु पर्रीकर यांनी शेवटी पणजी मतदारसंघातूनच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजता कुंकळयेकर यांनी केवळ एका ओळीचा राजीनामा सादर केला. राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे, अशी माहिती सभापतींनी पत्रकारांना दिली.४0 सदस्यीय विधानसभेत २ जागा रिकाम्या झालेल्या असून ३८ आमदार राहिलेले आहेत. विश्वजीत राणे यांनी वाळपईतून आमदारकीचा राजीनामा दिलेला असल्याने तेथेही आता पोटनिवडणूक होणार आहे. या दोन जागा भाजपने जिंकल्यास विधानसभेतील पक्षाचे संख्याबळ १४ होईल. काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. मगोप आणि गोवा फॉरवर्डचे प्रत्येकी ३, राष्ट्रवादी १ आणि ३ अपक्ष आमदार आहेत.पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्रिपदी गेले, तेव्हा पणजीतून पोटनिवडणुकीत सिद्धार्थ कुंकळयेकर हे निवडून आले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बाबूश मोन्सेरात यांचा पराभव करून पुन्हा विजय संपादन केला. केंद्रातून गोव्यात परतलेले पर्रीकर यांनी गेल्या १४ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते कोणत्याही मतदारसंघाचे आमदार नव्हते. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत निवडून यावे लागेल.कुंकळयेकर हे सध्या ईडीसीचे अध्यक्ष आहेत. लवकरच त्यांना पक्षातही चांगले स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
पर्रीकरांविरोधात पणजीत बाबूश!
By admin | Published: May 11, 2017 1:37 AM