पणजीत बदलाचे वारे? पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात काँटे की टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:15 PM2019-05-20T21:15:25+5:302019-05-20T21:15:29+5:30
निवडणुकीनंतर भाजप कार्यकत्यांनी आत्मविश्वासाने फटाके फोडले तरी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत यावेळी बदलाचे वारे दिसत आहे.
पणजी : निवडणुकीनंतर भाजप कार्यकत्यांनी आत्मविश्वासाने फटाके फोडले तरी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत यावेळी बदलाचे वारे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त झलेल्या या जागेवर कोण निवडून येतो याबद्दल उत्कंठा आहे. पर्रीकर यांच्या रुपाने आणि मधल्या काही अल्प काळात सिध्दार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे म्हणजे भाजपकडे हा मतदारसंघ होता. मात्र यावेळी चित्र वेगळे दिसत आहे.
रायबंदर, मळा, कोर्तीन, मुख्य टपाल कार्यालय परिसर या भागात काँग्रेसला यावेळी मतांची आघाडी मिळू शकते असा अंदाज बाधला जात आहे. काँग्रेसला यावेळी पणजीच्या या प्रतिष्ठेच्या जागेसाठी आपल्याला संधी असल्याचा जबरदस्त आशावाद आहे. बाबुश आपल्या आघाडीबद्दल काहीही बोलत नाहीत. परंतु प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ३ हजार मतांच्या आघाडीचा दावा केला आहे. मतदानाचा आढावा घेतला असता बाबुश यांच्याकडेच कल दिसत असला तरी मतांच्या आघाडीबाबत मात्र नेमके चित्र स्पष्ट होत नाही. ही आघाडी दीड ते दोन हजारांपर्यंत असेल असे गुप्तचर अहवाल सांगतो.
रायबंदर येथे सांपेद्र सरकारी प्राथमिक शाळा, जुनी गोमेकॉ इमारत, फोंडवे प्राथमिक शाळा, बाल भारती विद्यामंदिरमध्ये २ मिळून एकूण सहा बूथ आहेत. या सहाही बुथांवर बऱ्यापैकी मतदान झालेले आहे. बूथ क्रमांक १ वर ८१.१५ टक्के, बूथ क्रमांक २ वर ८१.१0 टक्के, बूथ क्रमांक ३ वर ७१.४१ टक्के, बूथ क्रमांक ४ वर ७१.६४ टक्के, बूथ क्रमांक ५ वर ७0.५१ टक्के आणि बूथ क्रमांक ६ वर ७१.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. काँग्रेस या केंद्रांवरील मतांच्या आघाडीबाबत आशावादी आहे.
बूथ क्रमांक १३ वर ८0.३१ टक्के मतदान झालेले आहे. सर्वात जास्त मतदान बूथ क्रमांक १६ वर आल्तिनो येथे जुन्या आयपीएचबी इमारतीतील मतदान केंद्रावर झाले. ८९.६९ टक्के मतदान याठिकाणी झाले. तर सर्वात कमी मतदान बूथ क्रमांक १५ वर आल्तिनो येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीतील मतदान केंद्रावर झाले. या ठिकाणी ६३.९६ टक्के मतदानाची नोंद झाली.
मुख्य टपाल कार्यालयाच्या मागील बाजूस तसेच चर्च स्क्वेअर परिसरात काँग्रेसलाच मतें मिळतात. २0१२ च्या निवडणुकीत बूथ क्रमांक १२ वर पर्रीकर मागे होते. मेरी इम्यॅक्युलेट हायस्कूलमधील या मतदान केंद्रात ६८.७५ टक्के मतदान झालेले आहे. काँग्रेसला हात देणाऱ्या मिरामार येथील बूथ क्रमांक २६ वर ६१.५६ टक्के, होम सायन्स कॉलेजच्या २७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ६७.८६ टक्के मतदान झालेले आहे.
मतदानाच्या दिवशी मिरामार येथे धेंपो कॉलेज इमारतीतील बुथ क्रमांक ३0 वर भाजप पदाधिकाऱ्याने काही मतदारांना बाबुश यांना मतदान करु नये यासाठी घराबाहेर पडू दिले नाही, अशी तक्रार आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी केली आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत चौकशी केली. हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दावा बाबुश समर्थक करतात. रायबंदर भागात बूथ क्रमांक १ जो जिल्हा पंचायत क्षेत्रातही येतो त्या बूथवर जि. पं. पोटनिवडणुकीत ४६१ इतके मतदान झाले होते. यावेळी ६८७ मतदान झालेले आहे.
पणजी मतदारसंघात ६२00 ख्रिस्ती मतदार असून यात सुमारे १५00 मतदार ख्रिस्ती सारस्वत आहेत. ही १५00 मते आजपर्यंत पर्रीकरांच्या पारड्यात जात असत, परंतु यावेळी चित्र वेगळे आहे. काँग्रेसला या मतांचा फायदा होऊ शकतो.
काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी युवकांना नोकऱ्यांचे दिलेले आश्वासन यामुळे युवा वर्गाचा कल त्यांच्याबाजून दिसला. रायबंदर, मळा भागात युवकांचा त्यांना पाठिंबा मिळाला.
गेली २४ वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे आहे मात्र या पोटनिवडणुकीत येथे भाजपच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर बाबुश यांच्या टेबलवर कार्यकर्त्यांची गर्दी जास्त दिसली. रायबंदर येथे एका बूथबाहेरील टेबलवर अवघेच भाजप कार्यकर्ते होते. आजवरचा इतिहास पाहता सोळा ते सतरा हजार मतदार पणजीच्या निवडणुकीत मतदान करीत असत. यावेळीही १६,९२४ एवढे मतदान झालेले आहे. ऑगस्ट २0१७ च्या पोटनिवडणुकीपेक्षा ते ११ टक्क्यांनी जास्त आहे. लोक उत्स्फूर्ततेने घराबाहेर पडले याचे कारण अटीतटीच्या लढती होत. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
११ हजार बहुजन समाजाच्या मतदारांपैकी ८ हजार भंडारी आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे स्वत: भंडारी आहेत व ते ऑगस्ट २0१७ च्या निवडणुकीत पणजीतील घराघरात फिरले होते. रायबंदर, मळा, आल्तिनो भागातील भंडारी मते त्यांनी मिळवली होती. बाबुश यांना त्याचा फायदा होऊ शकतो. १४५0 मुस्लिम, ३५0 गुजराती, १५0 खोजा आणि २९५0 बिगर गोमंतकीय मतदार आहेत. अल्पसंख्यांकांचा काँग्रेसकडेच कल दिसतो.
वेलिंगकर यांचे आव्हान
गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी यावेळी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपवर नाराज असलेले मतदार वेलिंगकर यांना मतदान करतील आणि त्यामुळे भाजपला फटका बसेल, असे दिसते. वेलिंगकर यांनी आपल्याला आठ ते साडेआठ हजार मतें मिळतील, असा दावा केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात तसेच मळा, रायबंदरमध्ये भाजपविरोधातील मतें त्यांच्या पारड्यात जाऊ शकतात.
सायलंट मतदार महत्त्वाची भूमिका बजावतील, असे वेलिंगकर यांना वाटते. काँग्रेसी उमेदवाराची दहशत आणि भाजपची सूडबुध्दी यामुळे सामान्य मतदार गोसुमंकडे वळला आहे, असा त्यांचा दावा आहे.
भाजपालाही जबरदस्त आत्मविश्वास
बोक द व्हाक, आल्त सांतइनेज या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या बूथवर विक्रमी मतदान झालेले आहे. जुन्ता हाऊसमधील २१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ७९.२२ टक्के मतदान झालेले आहे. फार्मसी कॉलेजमधील बूथ क्रमांक २४ वर ७२.३५ टक्के मतदान झालेले आहे. मळा, आल्तिनो तसेच सांतइनेज भागातही भाजपला अनुकूल असलेल्या भागात बºयापैकी मतदान झाल्याने भाजपही विजयाबाबत आशावादी आहे. भाजप नेत्यांचे असे म्हणणे आहे की, उलट काँग्रेसला नेहमीच हात देणाºया काही बूथवर अल्प मतदान झालेले आहे.
उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी आपल्याला १0 हजारांपेक्षा अधिक मते मिळतील, असा दावा केला आहे. आमचे कार्यकर्ते या निवडणुकीत तळमळीने वावरले आहेत आणि ही जागा जिंकून पर्रीकर यांना श्रध्दांजलीही दिली जाईल, असे ते म्हणाले. दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाजपला ८00 ते १२00 मतांची आघाडी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नायक यांना फेब्रुवारी २0१७ च्या निवडणुकीत १९४४ मते मिळाली होती. यावेळी ते किती मते घेतात हे पहावे लागेल. सीआयडी अहवालानुसार त्यांची मते १ हजाराच्या आतच असतील. निवडणुकीच्या काही मतदान केंद्रांबाहेर ‘आप’ची टेबलेही नव्हती. पणजीचे लोक ‘स्मार्ट’ आहेत. येत्या २३ रोजी निकालात ते दिसून येईल, असे वाल्मिकी सांगतात.