बाबुश यांच्या प्रचारासाठी पणजीत काँग्रेस नेत्यांचा डेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:16 PM2019-05-03T14:16:47+5:302019-05-03T14:34:58+5:30
बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
पणजी - विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिष बकाल यांनी माघार घेतली. यामुळे आता ६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. राजधानीतील प्रचारानेही वेग घेतला आहे. बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी काँग्रेसी नेत्यांनी पणजीत डेरा टाकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाबू कवळेकर तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घरोघर गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत होती. अपक्ष उमेदवार अनिष बकाल यानी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात, भाजपाचे सिध्दार्थ कुंकळ्येंकर, गोसुमंचे सुभाष वेलिंगकर, आपचे वाल्मिकी नायक तसेच दोन अपक्ष दिलीप घाडी आणि विजय मोरे मिळून ६ जण रिंगणात राहिले आहेत.
भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पणजीतील मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्यासाठी गिरीश चोडणकर व बाबू कवळेकर यांनी मळा येथून घरोघरी भेटीगाठी सुरू केल्या. यावेळी गिरीश म्हणाले की, ‘बाबुश हे स्वत: फिरत आहेतच शिवाय काँग्रेसी आमदार, पदाधिकारीही आजपासून त्यांच्या प्रचारासाठी घरोघर फिरतील. मळ्यातील अनेक कामे रखडलेली आहे. गेल्या २५ वर्षात येथील कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. मळा तलावाचे सौंदर्यीकरण, मार्केट प्रकल्प रखडला आहे. हे एक डास पैदास केंद्र बनले आहे.’
बांदोडकर समाधीस्थळी टाळे ; वेलिंगकरांनी गेटवर चढून मिळवला प्रवेश
दरम्यान, गोसुमंचे उमेदवार सुभाष वेलिंगकर हे मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर गेले तेव्हा तेथे त्यांना फाटकाला टाळे ठोकलेले आढळले. वेलिंगकर यांनाह गेटवर चढून आत प्रवेश करावा लागला. भाऊसाहेबांच्या समाधीला वंदन करुन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. वेलिंगकर म्हणाले की, ‘सरकारने गोव्याच्या या भाग्यविधात्याला बंदिस्त करुन नजरकैदेत ठेवले आहे, ते योग्य नव्हे. समाधी लोकांसाठी दर्शनाकरिता खुली असली पाहिजे. सकाळी ठराविक वेळेत ती उघडी ठेवावी. तेथे हवे तर सुरक्षा रक्षक नेमावेत. भाऊसाहेबांनी गोमंतकीयांना मोकळा श्वास घेऊ दिला तसा सरकारने भाऊसाहेबांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. आपली राजकारणे चालू ठेवण्यासाठी असले प्रकार करू नयेत.’