पणजी : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याविषयीची मुदत सोमवारी संपुष्टात आली. एकूण 10 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. यात काही डमी उमेदवारांचाही समावेश आहे. प्रत्यक्षात पणजीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये चौरंगीच लढत होणार आहे.
उमेदवारी अर्जाची मंगळवारी निर्वाचन अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्यास 2 मे रोजी मुदत आहे. 19 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर व गोवा सुरक्षा मंचातर्फे सुभाष वेलिंगकर यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात यांनी आपला आणखी एक अर्ज सोमवारी सादर केला. तसेच काँग्रेसचे गट अध्यक्ष प्रसाद आमोणकर यांनी डमी म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आपतर्फे वाल्मिकी नायक यांनी यापूर्वीच उमेदवारी सादर केली आहे.
विजय मोरे, दिलीप घाडी व अनिष बकाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला आहे. छाननीवेळी डमी अर्ज वगैरे बाद ठरतील. गोवा सुरक्षा मंचतर्फे डमी उमेदवार म्हणून महेश म्हांब्रे यांनी उमेदवारी सादर केली आहे. हिंदुस्तान जनता पार्टीतर्फे दिपक धोंड यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
दरम्यान, पणजीत भाजप-काँग्रेस-आम आदमी पक्ष आणि गोवा सुरक्षा मंच अशी चौरंगी लढत होणार आहे. पणजीत एकूण 22 हजार मतदार आहेत. सुमारे 18 हजार लोक मतदानासाठी येत असतात. भाजपने दहा हजार मते प्राप्त करण्याचे लक्ष्य यावेळी समोर ठेवले आहे. सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर हे यावेळी तिसऱ्यांदा भाजपतर्फे पणजीतून लढत आहेत. मोन्सेरात हे प्रथमच काँग्रेसच्या तिकीटावर लढत आहेत. यापूर्वी ते युजीच्या तिकीटावर लढले होते. सुभाष वेलिंगकर हे आयुष्यात प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. वाल्मिकी नायक हे दुस:यांदा निवडणूक लढवत आहेत.