पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली. उत्पल हे पणजीत भाजपच्या तिकिटाचे दावेदार होते. त्यांना डावलून भाजपने सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांना तिकीट दिल्याने बरेच भाजप कार्यकर्ते व भाजपचे अनेक मतदार नाराज झाले होते.उत्पल यांनी तिकीट गृहित धरून पणजीत प्रचार कामही सुरू केले होते. तिकीट नाकारले तरी उत्पल यांनी पणजीत भाजपचा प्रचार केला होता पण त्यांचा सहभाग खूप मर्यादित होता. पणजीत मनोहर पर्रीकर कधीच पराभूत झाले नव्हते. त्यांच्या रुपानेच पणजीचा आमदार हा गोव्याचा चारवेळा मुख्यमंत्री बनला होता. दरम्यान, उत्पलने प्रतिक्रिया देताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दांचा दाखला दिला आहे. अंधार नाहीसा होईल व पुन्हा सूर्य उगवेल, कमळ फुलेल असे त्यांनी पणजी मतदारसंघाविषयी म्हटले आहे. कुणीच हताश होण्याचे कारण नाही. पणजीत पराभव झाला याचे मात्र दु:ख वाटते, असे उत्पल म्हणाले. केंद्रात पुन्हा मोदी सरकारचा विजय झाला व देशाचे भवितव्य सुरक्षित बनले. याविषयी सर्वाचेच अभिनंदन असे उत्पल म्हणाले.
पणजीतील पराभव खूप वेदनादायी : उत्पल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:53 PM