पणजी : महापालिका अंदाजपत्रकात करवाढ तसेच वेगवेगळ्या शुल्कांमध्ये केलेल्या वाढीची माहिती ‘लोकमत’ला प्राप्त झालेली आहे. निवास व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आधी प्रत्येकी ३0 रुपये शुल्क होते ते वाढवून आता ५0 रुपये केले आहे. पोर्तुगीज पासपोर्टसाठी निवास दाखल्यासाठी ५00 रुपये आकारण्यात येत होते ते आता १५00 रुपये केले आहेत. साईन बोर्डच्या शुल्कात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. व्यापार परवाने, साईन बोर्ड फी वाढविली आहे. आधीच महागाईत भरडलेल्या नागरिकांचे यामुळे कंबरडेच मोडणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. येत्या गुरुवारी २८ रोजी मनपाची बैठक होत असून तीत अंदाजपत्रक मंजूर केले जाईल. निवासी वास्तू हस्तांतरण शुल्क ५ हजार रुपयांवरून ८ हजार रुपयांवर नेले आहे. पाणी जोडणीसाठी ना हरकत दाखल्याचे शुल्क २00 रुपयांवरून दुपटीने वाढवून ४00 रुपये केला आहे. जन्म, मृत्यू दाखल्याच्या १५ रुपये शुल्कात कोणताही बदल केलेला नाही. महापालिका क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीच्या जन्म, मृत्यू दाखल्याचे शुल्क मात्र १५ रुपयांवरून ५0 रुपयांवर नेले आहे. चुकीच्या नावाची दुरुस्ती करण्यासाठीचे शुल्क कैकपटींनी वाढविले आहे. आधी ३५ रुपये आकारले जात होते. आता ते भरमसाट वाढविले असून १५00 रुपये केले आहे. अधिवास दाखल्यासाठी निवासी इमारतीत प्रत्येक सदनिकेला ५00 रुपये, व्यावसायिक आस्थापनाला १ हजार रुपये तर दुकांनाना २ हजार रुपये शुल्क लागू होणार आहे. (प्रतिनिधी)
पणजी मनपाचे दाखलेही महागले !
By admin | Published: April 21, 2016 1:44 AM