नारायण गावस
पणजी: गोवा सरकार आणि वनविकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काजू महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. १० ते १२ मे असे एकूण ३ दिवस हा महोत्सव होणार आहे. दयानंद बांदोडकर मैदान, कांपाल पणजी येथे सदर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला प्रवेश मोफत असून दरदिवशी सायंकाळी ४.३० वा. नंतर विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आणि संगीत असा मोठा खजाना आहे. रात्री १० पर्यंत ते कार्यक्रम चालू राहाणार असून त्यात काजू गॅलरी, फॅशन शो, खेळ, स्टॉल्स तसेच विविध आकर्षक बक्षिसे यांचा समावेश आहे.
हा केवळ महोत्सव नाहीतर काजू शेतकरी आणि स्थानिक समुदायांसाठी आशेचा किरण आहे. आकर्षक कार्यक्रम आणि उपक्रमांसह, राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करताना स्थानिक व्यवसायांना, विशेषत: महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण स्वयं-सहायता गटांना सक्षम बनवण्याचा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक काजू प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकांपासून ते विविध ५० पेक्षा जास्त फूड स्टॉल्स काजू-आधारित स्वादिष्ट पदार्थांचे असणार आहेत. मुख्यंमत्र्यांनी गेल्या वर्षी या महाेत्सवाला कायम साजरा करण्याचा दर्जा दिला आहे.
काजू हे गोव्यातील एक प्रमुख पीक असून त्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी या महोत्सवांची आखणी करण्यात आली आहे. वनविकास महामंडळाने गोव्यात अनेक ठिकाणी काजूची लागवड केली असून ती आणखी वाढावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे. काजू पिकाला चांगला दर मिळावा तसेच आधारभूत किंमत लाभावी म्हणून राज्य सरकारच्या सहकार्याने प्रयत्न होत आहेत. काजूपासून विविध प्रकारची तयार होणारी उत्पादने एकाच ठिकाणी मिळावित आणि काजूला व्यासपीठ लाभावे म्हणून हा महोत्सव आयोजित केला आहे. गोव्यातील काजू बागायतदार या महोत्सवात सहभागी होणार असून खवय्यांना देखील तेथे मोठी पर्वणी लाभणार असल्याचे सांगण्यात आले.