म्हापसा : नाताळा निमित्त स्वच्छ कळंगुट सुंदर कळंगुट पर्यटकांसमोर उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने तसेच लोकांना मोकळ्या वातावरणात फिरणे शक्य व्हावे यासाठी कळंगुट परिसरातील अनेक गैरप्रकारांवर कारवाई करण्यात आली. केलेल्या कारवाईत अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली असल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.
कोणताही सण असो सुट्ट्या असो किंवा इतर कार्यक्रम असो कळंगुटातील जगप्रसिद्ध किनाऱ्यावर वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ सततची सुरुच असते. २० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत तर कळंगुट किंवा त्याच्या सभोवतालच्या भागात स्थानिकांसोबत पर्यटकांना फिरणेही कठीण होवून जाते. या अडचणींना विविध कारणे असली तरी कळंगुट परिसरात झालेली अतिक्रमणे त्याचाच एक भाग मानला जात आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पंचायतीकडून विशेष मोहिम हाती घेतली होती.
सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार नाताळ ते नवीन वर्षापर्यंत तरी लोकांना किमान मोकळ्या वातावरणात फिरणे शक्य व्हावे यासाठी मागील काही दिवसापासून ही मोहिम हाती घेण्यात आली होती. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर सदरची मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले. मोहिमेवर उपसभापती मायकल लोबो हे लक्ष देत होते. त्यांच्या निदर्शनाखाली ही मोहिम यशस्वी करण्यात आली. तसेच जि.पं. सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर पंचायतीचे पंच सदस्य यांनीही आप आपल्या प्रभागातून भाग घेतला होता. संपूर्ण मोहिम पोलीस संरक्षणात कसल्याच अडथळ््याविना हाती घेण्यात आल्याचे मार्टीन्स म्हणाले.
या मोहिमे अंतर्गत फुटपाथवरील सुमारे २० हून अधिक अतिक्रणे तसेच गाडे हटवण्यात आले आहेत. हटवण्यात आलेल्या गाड्यांमुळे लोकांना चालणे सोयीस्कर ठरणार असल्याचे मार्टीन्स यांनी सांगितले. पंचायतीची परवानगी न घेता तसेच कसल्याच प्रकारचा महसूल न देता विविध ठिकाणी उभारण्यात आलेले जाहीरातीचे सुमारे १२५ हून अधिक फलक काढून टाकण्यात आले.
मागील बऱ्याच काळापासून कळंगुट परिसरातील विविध रस्त्यांवर पार्किंगसाठी अडथळे निर्माण करणारी तसेच भंगार अवस्थेत वाहने टाकून देण्यात आलेली. या वाहनांमुळे पार्किंगसाठी जागेची अडवणूक झाली होती. टाकून देण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यापूर्वी ती हटवण्यासाठी मुदत देणारी नोटिस वाहनांवर पंचायतीच्या वतीने लावण्यात आली होती. देण्यात आलेल्या मुदतीत अनेक वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्यावरुन हटवली होती. त्यानंतर रस्त्यावर कायम असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे २० हून दुचाकी तसेच १५ हून जास्त चारचाकी गाड्या हटवण्यात आल्या. पुढील काही दिवस ही वाहने पंचायतीच्या ताब्यात राहणार असून त्यानंतर त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचे मार्टिन्स म्हणाले.