म्हापसा : ग्राम पंचायतीच्या सचिवांनी पंचायत मंडळाला विश्वासात न घेता आणि ठराव मंजूर न करता एका व्यक्तीला परवाना दिला. आपले बिंग ग्रामसभेत उघड होईल म्हणून सचिवांनी ग्रासभेतून काढता पाय घेतला, असा ाआरोप वेर्ला-काणका पंचायतीच्या सरपंच आरती च्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याप्रश्नी पंचायतीची ग्रामसभा स्थगित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित व्यक्तीच्या बांधकामाची पाहणी करुन नंतर त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे पंचायत मंडळाने ठरवले होते. पण सतत रजेवर जाणारे सचिव एका दिवसासाठी कामावर हजर झाल्या. दुसऱ्या दिवशी सचिव पुन्हा रजेवर गेल्या. याच काळात तो परवाना देण्यात आला असावा, असा आरोप सरपंचांनी व्यक्त केला. सचिव सभा अर्धवट सोडून गेल्याने आणि निरीक्षक नसल्याने वेर्ला-काणका पंचायतीची रविवारी बोलावलेली ग्रामसभा स्थगित करणे नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर सरपंचांना भाग पडले.
सरपंच आरती च्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतीच्या कार्यालयात पंचायतीची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी निरीक्षक नसल्याने तसेच पूर्णवेळ सचिव उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली. पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा सुरू होती. यावेळी कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले. पोलिसांच्या उपस्थितीबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. सचिवांच्या पंचायत सदस्यांना विश्वासान न घेता काम करण्याच्या कार्यपद्धतीचे, मनमानी कारभाराचा परिणाम पंचायतीवर होत आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन नव्या पूर्णवेळ सचिवांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली जाईल. ग्रामसभेला निरीक्षक उपस्थित होणार नाहीत, याची माहिती अखेरच्या क्षणी पंचायतीला देण्यात आली होती, असे काही पंच सदस्यांनी सांगितले.
सरपंच आरती च्यारी यांनी सांगितले की, पंचायतीला पूर्ण वेळ सचिव नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यमान सचिवांची नेमणूक २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. पण त्या सेवेत नियमीत हजर राहात नाहीत. महिनाभरातील बरेच दिवस त्या रजेवर असतात. रजेवरून पुन्हा सेवेत आल्यावर आपली कामे पूर्ण करुन पुन्हा रजेवर जातात. त्याचा परिणाम लोकांच्या कामावर परिणाम होतो.
विद्यमान सचिव शनिवारी कामावर आल्या. शनिवारी पंचायत मंडळाची बैठक होती. पण सभेत चर्चा करण्यास त्यांच्याजवळ वेळ नव्हता. त्यामुळे मंडळाची बैठक होऊ शकली नाही. त्याचदरम्यान सचिवांनी मंडळाला विश्वासात न घेता पोलिस स्थानकात पत्र पाठवून ग्रामसभेसाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली. सचिवांमुळे ग्रामसभेला पोलिस मागविण्याचा हा पहिलाच प्रसंग होता, असेही च्यारी म्हणाल्या. सभेला निरीक्षकही नसल्याने सभा रद्द करणे भाग पडले असं सरपंच च्यारी म्हणाल्या.
माझी मानसिक छळवणूक : सचिवांचा आरोप
दरम्यान, ग्रामसभेत बांधकाम प्रकरणाच्या मुद्यावरून लोक नाहक आमच्यावर आरोप करीत असल्याने, माझी मानसिक छळवणूक करीत असल्याने ग्रामसभा चालविण्यात होण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे आणि निरीक्षकांअभावी बैठक स्थगित करीत आहे असे सांगून सचिव निकीता परब या सभेतून उठून गेल्या.