म्हापसा : पंचायत फक्त साधन सुविधा निर्माण करण्याचे माध्यम नसून मानव संसाधन निर्माण करण्याचे ते एक माध्यम आहे. त्यासाठी आपला गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी पंचायतीने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
साळगाव मतदार संघातील रेयश मागूश पंचायतीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे, पायाभूत महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार केदार नाईक, माजी आमदार जयेश साळगावकर, जिल्हा पंचायत सदस्य संदीप कोरगावकर, पंचायतीच्या सरपंच योगिता पेडणेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सरकारने महिलांच्या विकासासाठी चतुर्थी निमित्त स्वयंपूर्ण ई मार्केटची योजना अस्तित्वात आणली आहे. ही योजना यापुढेही सुरूच राहणार असून महिलांनी तसेच स्वयंसेवी गटांनी तयार केलेल्या वस्तूंना ॲप द्वारे राज्यात तसेच राज्याबाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची सरकारची संकल्पना असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना दिली. पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी योगदान दिलेल्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जुन्या पिढीतील या लोकांचे सहकार्य घेऊन पंचायत क्षेत्रातील नवीन पिढी घडवावी अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी ही आपले विचार मांडले.