म्हापसा (गोवा) : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोग झालेला आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी जाहीर केले. सरकारतर्फे प्रथमच अशी माहिती जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या आजाराविषयी सत्य लपविले जात आहे, त्यांच्या प्रकृतीविषयी जनतेला माहिती द्यावी, अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक संघटना सातत्याने करत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी तर मुख्यमंत्र्यांना दाखवा नाहीतर श्राध्द तरी घाला, अशी अशोभनीय भाषा शनिवारी वापरली होती. काही जणांनी माहिती जनतेसमोर येण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पर्रीकरांच्या आरोग्यावरून काँग्रेस राजकारण करत आहे. काँग्रेसच्या एका विद्यमान आमदारालाही गंभीर आजार झालेला आहे, त्याविषयी आम्ही बोलत नाही.३१ रोजी मंत्रिमंडळाची बैठकमुख्यमंत्री पर्रीकरांच्या आजारपणामुळे आठ महिने गोवा मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही, यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. आता मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी येत्या ३१ आॅक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक होईल.
मुख्यमंत्री पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग; आरोग्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 1:33 AM