पणजी : घनचे कटर घन... व ओस्सय ओस्सयच्या निनादात राजधानी दुमदुमली. पणजी शिगमोत्सव समितीतर्फे शनिवारी सायंकाळी येथे रोमटामेळ व चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. सांतइनेज येथे काकुलो आयर्लंड येथून शिगमोत्वाची सुरुवात करण्यात आली. तेथून १८ जून मार्गावरून चर्च चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सुरुवातीला ढोल आणि ताशांच्या वाद्यांने शिगमोत्सवाची सुरुवात झाली. सुरुवातीला ओस्सय्य..ओस्सय्यच्या निनादात विविध भागातील रोमटामेळांच्या पथकातील कलाकारांनी वातावरणात शिगमोत्सवाचा माहोल तयार केला. रोमटामेळांच्या लयबद्ध तालावर थिरकणारी कलाकारांची पावले ढोल-ताशांच्या गजरात पुढे सरकत होती. चित्ररथ पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची पावलेही या तालांवर थिरकत होती. वैयक्तिक वेशभूषा स्पर्धेकांनी नागरिकांसमवेत, लहान मुलांसोबत फोटो काढले. शिगमोत्सवात विविध ऐतिहासिक देखावे, ऐतिहासिक पात्रे, धार्मिक पात्रे, गोमंतकीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारी घोडेमोडणी इत्यादी कलांचा समावेश होता. वेशभूषा स्पर्धेसाठी तरुणांपासून लहान मुलांनीही विविध वेषभूषा करून शिगमोत्सवात भाग घेतला होता. यात मारुती, वीरभद्र, साईबाबा इत्यादी वेशभूषा करून कलाकारांनी लोकांचे मनोरंजन केले. शिगमोत्सवासाठी राजधानीत पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. रस्त्यांच्या दुतर्फा गुढ्या, झेंडे उभारण्यात आले होते. पारंपरिक मखमली छत्र्यांचे खांब उभारण्यात आले होते. केशरी, भरजरी कापड गुंडाळलेल्या कमानी, भगव्या पताका असा मिरवणुकीचा साज रस्त्यांच्या दुतर्फा शिगगोत्सवाच्या वातावरणाला आकर्षित बनवत होते. ऐतिहासिक पात्रांतील बाहुलेही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींवर, दुकानांवर विद्युत रोषणाई केल्याने रात्रीच्यावेळी हा परिसर अत्यंत आकर्षक भासत होता. रस्त्यांवर काही अंतर सोडून नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. या आसनांवर खास करून वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन येणाऱ्या महिलांना बसण्यासाठी प्राधान्य देण्यात येत होते. शिगमोत्सव समितीचे स्वयंसेवक याबाबतची काळजी घेताना दिसत होते. स्थानिक लोकांबरोबरच देशी पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. विदेशी पर्यटकही शिगमोत्सवाचा आनंद लुटताना आणि वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या पात्रांसोबत छायाचित्रे काढताना दिसत होते. यंदा पोलीस खात्याने दिलेल्या सूचनेनुसार शिगमोत्सव समितीने चित्ररथ मिरवणूक शिस्तीत आणि लवकर संपविण्याचा प्रयत्न केला. राजधानीतील वाहतूक व्यवस्थाही सायंकाळपुरती बदलण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांची फौज रस्त्यावर उतरली होती. त्याचप्रमाणे महिला पोलीसही नजर ठेवताना दिसत होत्या. (प्रतिनिधी)
पणजीत घनचे कटर घन...
By admin | Published: March 15, 2015 2:56 AM