पणजी : ज्येष्ठ व गरजू नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन वितरण व्यवस्था राबवली. महापालिकेने जाहीर केलेल्या हेल्पलाइनवर सकाळपासून अनेकांचे फोन खणखणले. त्यानुसार दिवसभरात शक्य तेवढा माल लोकांपर्यंत पोचविण्याचे काम मनपाने केले. महापालिका क्षेत्रापुरती ही व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे २०० लोकांच्या ऑर्डर्स आल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. करंजाळे, रायबंदर भागात ऑर्डरनुसार मालाची दोन वाहने पाठवली . प्रत्येक वाहनावर दहा जणांची नियुक्ती केली आहे. ऑर्डरप्रमाणे सामानाचे पॅकिंग करण्यासाठी २५ ते ३० कर्मचारी वावरत आहेत. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू लोकांना आम्ही दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवीत आहोत, असे मडकईकर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महापालिकेची या सेवेतील भूमिका केवळ डिलिव्हरी बॉयसारखी आहे. वस्तूंची यादी आम्ही जाहीर केली आहे, त्यानुसार पुरेसा माल उपलब्ध करण्यात आला असून गरजू लोकांना तो पुरविला जाणार आहे. हेल्पलाइनवर सकाळपासून अनेकांचे फोन आले त्यानुसार मालाचा पुरवठा करण्यात आल्याचे मडकईकर म्हणाले. इमारतींमध्ये प्रत्यक्ष सदनिकांपर्यंत आम्ही जात नाही तर इमारतीच्या प्रवेशद्वारावर वाहन ठेवतो. लोकांनी तेथून माल घ्यायचा आहे. या कामासाठी आम्ही कोणतेही डिलिव्हरी शुल्क आकारत नाही. ज्या दराने आम्ही माल विकत घेतलेला आहे, त्याच दराने लोकांना पुरविला जात आहे, असे महापौरांनी सांगितले.
ही आहे हेल्पलाइन!महापालिकेने किराणा मालाच्या डिलिव्हरीसाठी ०८०४७१९१००० क्रमांकाची हेल्पलाइन जाहीर केली आहे. दैनंदिन जीवनातील आवश्यक तांदूळ, मीठ, साखर, तेल, राजमा, मसूर डाळ, तुरडाळ, मुगडाळ, चहा पावडर, आटा, बटाटा, कांदा, मिरची, टोमॅटो, हळद पावडर, मिरचीपूड, कोथिंबीर पावडर आदी वस्तू घरपोच डिलिव्हरीसाठी उपलब्ध केल्या आहेत.
हेल्पलाइन सतत व्यस्तदरम्यान, काही लोकांनी महापालिकेची हेल्पलाइन सतत व्यस्त होती. फोन केला तरी लागत नव्हता, अशी तक्रार केली. रायबंदर येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स म्हणाले की, हेल्पलाइनचा क्रमांक कुठल्यातरी बंगळुरूच्या आस्थापनाचा असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. ते म्हणाले की आपण आयुक्त संजित रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधून हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सांगितले की, केवळ पणजीच नव्हे तर सावर्डे, वास्को आदी ठिकाणहूनही फोन आले आणि त्यामुळे हेल्पलाइन व्यस्त राहिली. सकाळच्या सत्रात हजारो कॉल्स आले आयुक्तांनी सांगितले. पहिले दोन दिवस ऑर्डर घेऊन नंतर पुरवठा करणार आहोत, असे आयुक्तांनी आपल्याला सांगितल्याचे आयरिश संतापजनक स्वरात म्हणाले.