पणजी : आंदोलन मागे घेतल्यानंतर सर्व पॅरा शिक्षकांनी शनिवारी आपापली नियुक्ती पत्रे स्वीकारली. सोमवारपासून ती कामावर रुजू होणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या आशवासन वजा इशा-यानंतर मूदतीच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांनी नियुक्तीपत्रे स्वीकारली.
येत्या शैक्षणिक वर्षी सेवेत नियमित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिक्षकांनी शनिवारी सर्व शिक्षा अभियानच्या नियुक्ती पत्रे स्वीकारली. २५ नोव्हेंबरपर्यंत नियुक्तीपत्रे स्वीकारून कामावर रुजू झालेल्यांनाच येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला सेवेत कायम केले जाईल तसेच २५ नोव्हेंबरपर्यंत नियुक्तीपत्रे न स्वीकारलेल्यांना आणि सेवेत रुजू न झालेल्यांना कामावरून काढून टाकले जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत शनिवारी संपत असली तरी शनिवारी सर्व शिक्षा अभियानचे कार्यालय बंद असते. त्यामुळे शिक्षण खात्याकडून विशेष आदेश देऊन ही कार्यालये शनिवारी खुली ठेवण्यात आली होती. काही शिक्षकांनी शुक्रवारी तर काही शिक्षकांनी शनिवारी नियुक्तीपत्रे स्वीकारली. प्रत्यक्ष शाळेत रुजू होण्यासाठी त्यांना त्यांच्या शाळा कोणत्या हे सोमवारी सांगण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना शनिवारी प्रत्यक्ष शाळेत कामावर हजर राहता आले नसले तरी सर्व रुजू झाले असल्याच खात्याकडून मानून घेण्यात आले आहे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध विद्यालयात १२ वर्षांपूर्वी पॅरा शिक्षक म्हणजेच रेमेडियल शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या शिक्षकांना सेवेत कायम करून घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी काँग्रेस राजवटीत आणि भाजपा राजवटीतही केली होती. भाजपा सरकारने त्यांना कायम करून घेण्याची तसेच प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाचे अधक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यांना तसे लेखी आश्वासनही दिले होते. त्या अश्वासनांच्या प्रती घेऊनच त्यांनी पूर्वी भाजपाच्या मुख्यालयात आणि नंतर सचिवालयाजवळ निदर्शने केली होती. काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
सेवेत रुजू झाली असली तरी आंदोलन मागे घेण्यात आले नसून ते केवळ स्थगित ठेवण्यात आल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.