पणजी : वी वॉन्ट जस्टीस अशा जोरदार घोषणा देत आणि सरकारने आपल्या दूरवर बदल्या करून अन्याय केल्याचा दावा करत राज्यातील पॅरा शिक्षक महिलांनी भाजपाच्या येथील कार्यालयासमोर बुधवारी मोठे धरणे आंदोलन केले. भाजप कार्यालय असलेल्या इमारतीच्या प्रवेश दारालाच पॅरा शिक्षिकांनी घेराव घातला.काहीशा तंग वातावरणात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाजपा कार्यालयातून आपल्या वाहनाच्या ठिकाणी गेले. त्यांच्या मागे जात महिला शिक्षिकांनी घोषणाबाजी केली. आपल्याला वेतन कमी मिळते व तरीही सरकारने मुद्दाम आपल्या दूरवर बदल्या केल्या आहेत, असे पॅरा शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यांना सेवेत कायम केले जावे अशीही मागणी आहे. दूरवर झालेल्या बदल्यांमुळे आपल्यावर मोठा अन्याय झाला असून वाहतुकीवरच बहुतांश पैसा खर्च होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.आपले म्हणणे मांडण्यासाठी पॅरा शिक्षक महिला प्रथम बुधवारी सकाळी पर्वरी येथील सचिवालयासमोरील मुख्य प्रवेशदारावर जमल्या. तिथे त्यांना पोलिसांकडून रोखण्यात आले. दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री पर्रिकर हे पत्रकार परिषद घेण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात आले होते. पॅरा शिक्षिकांना ही माहिती मिळताच त्यांनी आपला मोर्चा भाजपच्या कार्यालयाकडे वळवला. पॅरा शिक्षिकांनी घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला. बरेच पोलिस भाजप कार्यालयाच्या मुख्य दाराकडे ठेवण्यात आले.पत्रकार परिषद संपवून मुख्यमंत्री सर्वप्रथम बाहेर निघू लागले. यावेळी आपले म्हणणे ऐकून घ्यावे असा आग्रह पॅरा शिक्षक महिलांनी धरला. मात्र पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्री पुढे पुढे जाऊ लागले. ते त्यांच्या वाहनाकडे जात असतानाच त्यांच्या मागे सगळ्या महिला पॅरा शिक्षक जाऊ लागल्या. आम्ही देखील पणजी मतदारसंघातील आहोत, आमचे म्हणणो ऐकून घ्या, असे काही शिक्षिका म्हणाल्या. मुख्यमंत्री पुढे जातच राहिले. सरकारविरुद्ध महिला शिक्षिकांनी जोरदार घोषणा दिल्या. मुख्यमंत्री आपल्या वाहनात बसले व निघून गेले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर हे यावेळी भाजपाच्या कार्यालयातच बसून होते. मात्र मुख्य दारावरून आंदोलक पॅरा शिक्षक मागे हटेना. एक तासानंतर तेंडुलकर हे भाजपच्या कार्यालयाबाहेर आले.गेल्या निवडणुकीवेळी तेंडुलकर यांनीच आमच्या मागण्या मान्य करणारे पत्र आम्हाला भाजपतर्फे दिले होते, असे पॅरा शिक्षकांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी ते पत्रही दाखवले. आमच्याकडून मते घेतली पण आमचा प्रश्न सोडविला जात नाही, असे पॅरा शिक्षकांनी सांगून तेंडुलकर यांना घेराव घातला. यावेळी तेंडुलकर त्यांना काहीच उत्तर देऊ शकले नाही. मिश्कील हास्य करत तेंडुलकर तिथून पोलिस बंदोबस्तातच निसटले.
पॅरा शिक्षक महिलांचं भाजपाच्या येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 7:37 PM