- सुशांत कुंकळयेकर
मडगाव - वर्षभरापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेल्या ‘त्या’ तीन वर्षीय मुलीचा पत्ता गोव्यातील कोकण रेल्वे पोलिसांना लागला असला तरी या बालिकेचे पालक सध्या कुठे आहेत याचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या रिजवान कालू इंदू (35) या संशयिताला रेल्वे पोलिसांनी मंगळुरुहून ताब्यात घेतले आहे.
1 नोव्हेंबर 2017 च्या मध्यरात्री मडगावच्या कोंकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या आईसोबत झोपलेल्या मरियम या तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसानी दिलेल्या माहितीप्रमाणो सध्या ही बालिका भोपाळ येथील बाल निवारा केंद्रात आश्रयास असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यानच्या काळात हुबळी येथे रेल्वेस्थानकाकडेच रहाणाऱ्या तिच्या पालकांनी आपली जागा बदलल्याने एक वर्षापूर्वी झालेली ताटातूट अजुनही जुळली गेली नाही.
कोकण रेल्वेचे पोलीस निरिक्षक राम आसरे यानी दिलेल्या माहितीप्रमाणे, सदर बालिकेच्या अपहरणानंतर गोवा पोलिसांनी देशातील सर्व रेल्वे स्थानकावरील पोलिसांना सतर्क केले होते. सदर बालिकेचे अपहरण ज्यावेळी झाले होते त्यावेळी आरोपीची छबी स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांयात टिपली गेली होती. कोकण रेल्वे पोलीसांनी ही व्हीडीओ चित्रफीत सर्व स्टेशनांना पाठवून दिली होती. याच फितीवरुन संशयित रिजवान हा मंगळुरु रेल्वे स्टेशनावर वावरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तेथे अटक करण्यात आली. काल रविवारी गोव्यातील रेल्वे पोलिसानी त्याला ताब्यात घेतले.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्याशी संपर्क साधाला असता, सदर आरोपी त्या बालिकेला घेऊन भोपाळला गेला होता. तेथे त्याने त्या तीन वर्षीय बालिकेला भीक मागण्याच्या धंदय़ास लावले होते. मात्र भोपाळ रेल्वे पोलीसांच्या एका महिला उपनिरिक्षकाच्या सदर बालिकेचे भिक मागणो नजरेस आल्यानंतर तिने त्या बालिकेला ताब्यात घेऊन तिथल्या स्थानिक निवारा आश्रमात पाठवले होते. दरम्यानच्या काळात गोवा पोलीसांनी मुंबइर्ंत जाऊनही या बालिकेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणो आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. सदर बालिकेला भोपाळ रेल्वे स्टेशनावर पोलीसानी ताब्यात घेतल्यानंतर आपण गोत्यात येणार या भीतीने तो मंगळुरुला येऊन राहू लागला. शेवटी मंगळुरुमध्येच त्याला अटक करण्यात आली. गोवा पोलीसांनी हुबळी पोलिसांकडे सध्या त्या बालिकेच्या आईवडिलांचा पत्ता शोधून काढण्याची विनंती केली आहे. जर या प्रयत्नाला यश आले तरच त्या दुर्दैवी बालिकेला आपले आईवडिल सापडतील अन्यथा तिच्या नशिबाचे वाईट भोग कायमच रहाणार आहेत.