वास्को: वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराचा १२५ वा अखंड २४ तासाचा श्री दामोदर भजनी सप्ताह साजरा करण्यासाठी रविवारी (दि.३०) बाजारकार उत्सव समिती निवडण्यात आली असून श्री. परेश जोशी यांची समितीवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. श्री. संतोष खोजुर्वेकर यांना समितीचे सरचिटणीस तर श्री. जितेंद्र शेटतानावडे यांना खजिनदार म्हणून निवडण्यात आले.
१० ऑगस्ट रोजी वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या १२५ व्या अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाची सुरवात होणार आहे. त्या निमित्ताने रविवारी (दि.३०) वास्कोतील श्री दामोदर मंदिरात बोलवलेल्या बैठकीत १२५ व्या श्री दामोदर भजनी सप्ताह बाजारकार उत्सव समिती निवडण्यासाठी केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बैठकीत उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष विष्णू गारोडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष खोजुर्वेकर यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला असून त्याला उपस्थितांनी मान्यता दिली. मावळते खजिनदार दामू कोचरेकर यांनी मागील वर्षाचा जमाखर्च सादर केला असून त्याला सर्वमताने मान्यता दिली.
ह्या सभेत विविध विषयावर चर्चा झाली असून त्यात चंद्रकात गवस, प्रकाश गवस, विजय नागवेकर, अरुण आजगावकर, आत्माराम नार्वेकर, माजी अध्यक्ष शैलेंद्र गोवेकर, माजी उपाध्यक्ष शेखर खडपकर, वामन चोडणकर, प्रशांत लोटलीकर यांनी भाग घेतला. नंतर केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४ - २५ ची समिती निवडण्यात आली. त्यात अध्यक्ष परेश जोशी, उपाध्यक्ष नरेंद्र गुरव, सरचिटणीस संतोष खोजुर्वेकर, खजिनदार जितेंद्र शेटतानावडे यांची निवड करण्यात आली. तसेच उत्सव समितीचे सभासद यावेळी निवडण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थितांचे आभार अध्यक्ष परेश जोशी यांनी मानले. पुढील बैठक श्री दामोदर मंदिरात बुधवार (दि.१०) सायंकाळी ५.३० वाजता घेण्यात येणार आहे. त्यात सप्ताह साजरा करण्याविषयी चर्चा करून वेगवेगळे निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच त्या बैठकीत उपसमिती निवडण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस संतोष खोजुर्वेकर यांनी दिली.