लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बाणस्तारी अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कार चालक श्रीपाद ऊर्फ परेश मिनाथ सावर्डेकर याला गुरुवारी १८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. पोलिसांनी मेघनाचा जबाब घेतला असून तिने पती परेशच गाडी चालवत असल्याचे सांगितलेच तर त्यांच्या मुलांनीही वडील कार चालवत असल्याचा जबाब दिल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
६ ऑगस्ट रोजी दारूच्या नशेत बेदरकारपणे कार चालवून अपघात करून तिघांचा जीव परेशने घेतला होता. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून त्याचा जामीन मिळविण्यासाठी खटाटोप सुरू होता. त्याचा अर्ज फोंडा न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्याने खंडपीठात धाव घेतली होती. गुरुवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी घेत त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
साक्षीदारांवर दबाव न आणणे, १ लाख रुपये हमी आणि १ लाख रुपयांच्या रकमेचे दोन हमीदार, गोव्याबाहेर न जाणे आणि तपास अधिकाऱ्यासमोर ८ दिवस हजेरी लावणे या अटी त्याच्यावर लादण्यात आल्या आहेत. दर दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत तो क्राइम ब्रँच कार्यालयात हजेरी लावणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे सुनावणीदरम्यान परेशला जामीन मंजूर व्हावा यासाठी त्याचे वकील आग्रही होते, तर दुसऱ्या बाजूने सरकारी वकिलाने परेशच्या कोठडीसाठी आग्रह धरला नाही तो नाहीच, शिवाय त्याची कोठडी नको असल्याचेही न्यायालयात सांगून टाकले. यामुळे परेशच्या जामीन अर्जावर निवाडा सुनावणी करणे न्यायालयाला सोपे झाले. दरम्यान, मेघना हिच्या जामीन अर्जावर २३ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, याच प्रकरणात तिच्या मुलांची न्यायदंडाधिकायांसमोर जवानी घेण्यात येत असल्यामुळे मेघनाच्या अर्जावरील सुनावणी तहकूब करून ती आज होणार आहे.
मेघना बनली साक्षीदार?
अपघात झाला तेव्हा मर्सिडीज कार परेशच चालवित होता, असा कबुली जबाब परेशची पत्नी मेघना सावर्डेकर हिने फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाला सीआरपीसी १६४ अंतर्गत दिली आहे. म्हणजेच पतीच्या गुन्ह्याला पत्नीच साक्षीदार असे तूर्त म्हणता येईल. विशेष म्हणजे पोलिसांनी परेशच्या मुलांचीही जबानी घेतली असून आपले पप्पाच गाडी चालवत असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.