'खाणप्रश्नी भाजपकडे तोडगा नाहीच, पर्रीकर यांनीच खाणी बंद करून घोळ घातला'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:24 PM2019-04-14T16:24:25+5:302019-04-14T16:25:15+5:30
बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले
पणजी - राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी भाजपकडे कोणताही तोडगा नाही. २०१२ मध्ये पर्रीकर मुख्यमंत्री असताना भाजपनेच खाणी बंद केल्या. हा पक्ष यावर मुळीच तोडगा काढू शकणार नाही, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसने केला आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. यतिश नायक यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढाच वाचला.
ते म्हणाले की, बेरोजगारी तसेच अन्य सार्वजनिक प्रश्नावर भाजप सरकार अपयशी ठरले. जीएसटी, नोटाबंदीने खाजगी उद्योगही मारून टाकले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती त्याची पुनरावृत्ती आता केली जात आहे. २०१४ मध्येही खाणी सुरू करू, असे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु आज २०१९ उजाडला तरी हे आश्वासन भाजप पूर्ण करू शकला नाही. पुन्हा पुन्हा फसवून घ्यायला गोव्याचा मतदार मूर्ख नव्हे, असे नायक म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की 'खाण प्रश्न सोडवणार असे आश्वासन देणाऱ्या भाजपने हा प्रश्न नेमका कसा सोडवणार? त्यांच्याकडे काय तोडगा आहे? हे स्पष्ट केलेले नाही. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी कोणतेही ठोस धोरण आणि स्पष्टता भाजपकडे नाही. आज लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार खाण पट्ट्यातील मतदारसंघांमध्ये फिरतात तेव्हा त्यांना अवलंबित याचा जाब विचारतात, परंतु भाजपच्या या उमेदवारांकडे उत्तर नसते. मध्यंतरी अवलंबितांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रश्नावर केवळ 'देखता हूँ', असे म्हणून बोळवण केली.
केंद्रीय आयुषमंत्री तथा भाजपचे उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत खाण प्रश्नावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल नायक यांनी केला. भाजप जनतेकडे खोटारडेपणा करत आहे. लोकांची फसवणूक करत आहे, असे आरोप त्यांनी केले. देशभरात जीएसटी, नोटाबंदी आणून भाजपने खाजगी क्षेत्रही मारून टाकले. यामुळे बेकारी प्रचंड वाढलेली आहे आणि त्याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप नायक यांनी केला. ते म्हणाले की, 'अच्छे दिन आयेंगे', असे २०१४ च्या निवडणुकीत भाजप म्हणत होता. आता अच्छे दिन आलेही म्हणत नाही आणि अच्छे दिन येतील असे म्हणत नाही. आता त्यांनी 'चौकीदारा'चा जयघोष चालवला आहे, अशी टीका करत लोक त्यांना स्वीकारणार नाहीत, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या तिन्ही जागा काँग्रेस उमेदवारच जिंकतील, असा दावा नायक यांनी केला. केंद्रात आणि कालांतराने राज्यातही काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय पै, साळगांव गटाध्यक्ष अतुल नाईक आदी उपस्थित होते.