पणजी - मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे सांगण्यात येत असलेली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झालीच नसल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाल्याचा पक्षाचा दावा खरा ठरविणारी व्हीडिओ क्लिपिंग भाजपने सादर करावी असे आव्हान त्यांनी दिले आहे. गंभीररित्या आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीचे विडिओ कॉन्फरन्सिंगद्वार यजमानपद भूषविले असे सांगून सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. तसेच आजारी मुख्यमंत्र्यांच्या आजाराचाही गैरफायदा घेत आहे असा आरोप त्यांनी केला. बैठक वगैरे काहीच झालेली नाही. केवळ सुटकेस ते सुटकेस व्यवहार झाले असतील. आपला फायदा पाहून पैशेवाल्यांचे प्रस्ताव मंजूर केल्याचाही आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांची प्रकृती कशी आहे आणि कोणत्या परिस्थितीत त्यांना दिल्लीहून गोव्यात आणले गेले हे जनतेने पाहिले आहे. त्यांचे एक छायाचित्रही घेण्याची परवानगी पत्रकारांना नाही. ते बैठक घेण्याच्या परिस्थितीत मुळीच नाहीत हे स्पष्ट असताना ही लपवाछपवी कशासाठी करीत आहात असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या आजाराचा गैर फायदा सध्या पक्षातील आणि सरकारातील लोकांकडून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विकासासाठी आमदारकीचा राजीनामा दिला म्हणणाºया दयानंद सोपटे हे लोकांना फसविण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत, परंतु लोक त्यांना पुरते ओळखून चुकले आहेत. भाजप सरकारने मांद्रेत १०५ नोकºया दिल्याचा दावा करणाºया सोपटे यांनी ही १०५ नावे जाहीर करावी असे आव्हानही पणजीकर यांनी दिले. जिथे भाजपचे आमदार आणि मंत्रीच आपल्याला पाच नोकºयाही दिल्या नसल्याची तक्रार करतात तिथे सोपटेना १०५ नोकºया कोठून मिळाल्या असा प्रश्न त्यांनी केला. सुभाष शिरोडकर यांना मिळालेले ७० कोटी रुपये कायदेशीर असते तर त्यांना आमदारकी सोडावी का लागली याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे असे त्यांनी सांगितले.
पर्रीकरांनी आयपीबीची बैठक घेतलीच नाही, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 8:48 PM