ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 13 - मनोहर पर्रीकर यांच्या रुपाने गोमंतकीयांनी आपल्या मंत्रिमंडळाला एक रत्नच दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांची तोंडभर स्तुती केली. संरक्षणमंत्रिपदाची पर्रिकरांची कारकीर्द स्वच्छ असल्याचा निर्वाळा देताना कोणीही त्यांच्याकडे बोट दाखवू शकलेले नसल्याचे मोदी म्हणाले. या स्तुतिसुमनांवरून पर्रीकर दिल्लीतच राहतील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आपल्या भाषणातील सुमारे सात मिनिटे त्यांनी पर्रीकरांच्या स्तुतिवरच घालवली. सैन्य दलाचा वन रँक वन पेन्शनचा (ओआरओपी) प्रश्न गेली ३0 वर्षे रखडला होता. पर्रीकर यांनी तो सोडवला. गोमंतकीयांनी आपल्याला उत्तम साथिदार दिला त्याबद्दल गोव्यातील जनता अभिनंदनास पात्र आहे. गोव्याला राजकीय अस्थैर्याच्या आजाराने बरबाद केले होते. पर्रीकर यांनी गोव्यात राजकीय स्थैर्य आणले. विकास, लोक कल्याणकारी योजना दिल्या. नीतीच्या आधारावर राज्य केले. ते गोव्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आपण गुजरातचा मुख्यमंत्री होतो. पर्रीकर यांनी त्यावेळी गोव्यात ज्या योजना राबवल्या त्या योजनांचा मीही बारकाईने अभ्यास करीत होतो. गृहिणींना दरमहा दीड हजार रुपये मानधन देणारी ह्यगृहआधारह्ण, मुलींना विवाहासाठी १ लाख रुपये देणारी लाडली लक्ष्मी योजना किंवा ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मानधन देणारी योजना व आता जनतेच्या आरोग्याचा विमा उतविणारी दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजना अशा योजना देशातील अन्य राज्यांमध्ये कुठेही नाहीत. गोव्याची प्रगती नतमस्तक होण्यासारखीच आहे. आयआयटीवाले पर्रीकर दहा वाक्यात सांगायची गोष्ट एकाच वाक्यात सांगतात कधी कधी आपल्यालाही समजून घेताना अडचण येते, असेही मोदी पर्रीकरांच्या हुशारीबद्दल बोलताना म्हणाले. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत पर्रीकर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुन: गोव्यात येतील, अशी अटकळ गेले काही महिने बांधली जात होती. अर्थात पर्रीकर यांनी आपण केंद्रातच राहीन, असे आधीही स्पष्ट केलेले आहे. मोदी यांनी त्यांच्या कामावर अत्यंत समाधान दाखवून उलट स्तुतीच केल्याने पर्रीकर कें द्रातच राहतील हे आता अधोरेखित झाले आहे.
पर्रिकर म्हणजे गोमंतकीयांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला दिलेले रत्नच- मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 7:16 PM