पणजी : काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा राज्य सरकार पुरस्कृत आहे. कारण मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गृह खाते झोपलेले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, अशी टीका काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
पर्रीकर यांना पूर्वीही लोकांची सहानुभूती नव्हती व आता तरी मुळीच राहिलेली नाही, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महिलांवर हात टाकला. आमच्यावर हल्ला केला. अशा प्रकारच्या गुंडगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने सतिश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणले आहे. आपण भाजपच्या कृतीचा निषेध करते, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे अशिक्षित खासदार असून तेही काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावेळी पुढे होते, असे कुतिन्हो म्हणाल्या.
लोकशाहीत गुद्दे चालत नाहीत, मुद्दे असावे लागतात. मुद्दे संपल्याने भाजप गुद्दय़ांवर आला. आम्ही देखील कमी नाही पण आम्ही असला हिंसक मार्ग स्वीकारणार नाही, आम्ही मुद्दे मांडू, असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे म्हणाले.
राहुल गांधींकडून कौतुक लोकशाही भाजपला निराश करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेबाबत सोशल मिडियावरून व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर नियोजितपणे भाजपने हल्ला केला. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भ्याड हल्ला करण्यासाठी जे आले होते, त्यांचे बॉस दिल्लीत बसतात. काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे गांधी यांनी म्हटले आहे. गोव्यातील महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी जी गांधीगिरी केली, त्याविषयी अभिमान वाटतो. अशा प्रसंगातच खरे कोण ते कळून येत असते, असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे.