ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - संख्याबळाच्या बाबतीत काँग्रेसच्या मागे पडलेल्या भाजपाला गोव्यात सत्तास्थापन करण्यासाठी अनेक खटपटी लटपटी कराव्या लागल्या. दरम्यान, आज मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चूक केली. त्यामुळे त्यांना दोन वेळा शपथ घ्यावी लागली.
आज संध्याकाळी शपथग्रहण समारंभादरम्यान पर्रिकर यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र पर्रिकरांनी सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ही चूक लक्षात आणून दिल्यावर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. पर्रिकर हे गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री ठरले असून, एकूण चौथ्यांदा ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.
गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र काँग्रेसची याचिका फेटाळत गोवा विधानसभेत भाजपाला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मनोहर पर्रिकर यांचा सत्ता स्थापनेचा दावा फेटाळून लावण्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला धारेवर धरले होते.