ऑनलाइन लोकमत/सदगुरू पाटील
पणजी,दि. 1 - देशाचे संरक्षण मंत्रीपद सोडून मनोहर पर्रीकर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आले. मात्र पर्रीकर यांना अजून गोव्यात सूर सापडलेला नाही. पहिल्याच पावसात गोव्याची झालेली दुर्दशा ही बरीच बोलकी आहे, असे विधान शिवसेनेचे खासदार व गोव्यातील शिवसेनेचे प्रभारी संजय राऊत यांनी गुरुवारी केली.
खासदार राऊत गोवा भेटीवर आले आहेत. गुरूवारी पणजीत बोलताना ते म्हणाले की, विमानतळावरून पणजीपर्यंत येताना मी गोव्याची पावसात झालेली दशा पाहिली. सगळ्या शहरांतील रस्ते आणि गल्ल्या बुडाल्याचे व सर्वत्र कचरा वाहून आल्याचे पहायला मिळाले. हेच मुंबईत घडले असते तर भाजपने आम्हाला जाब विचारला असता.
राऊत म्हणाले की गोव्यात आता विधानसभेच्या दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होतील. आम्ही त्या लढवू. मनोहर पर्रीकर हे पणजीत उमेदवार असतील याची कल्पना आहे पण काही फरक पडत नाही. स्व. इंदिरा गांधी यांच्या विरोधातदेखील निवडणुका लढविल्या जायच्या.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आम्हाला सोडून गेला पण प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच पक्षाशी आमची युती सुरूच राहील. गोव्यात सेनेच्या संघटनात्मक बांधणीचे काम आम्ही हाती घेतले आहे. राखी नाईक यांची आम्ही शिवसेना राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.