पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सद्याची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन सध्या भाजपाचे कुणीच केंद्रीय नेते किंवा गोवाभाजपामधीलही नेते पर्रीकर यांच्याशी जास्त संवाद साधू शकत नाहीत. पर्रीकर यांच्याकडे तूर्त मुख्यमंत्रीपद आहे. पण नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध घेणे हे अपरिहार्य आहे. ही प्रक्रिया सध्या दिल्लीत सुरू असून नवा मुख्यमंत्री शोधण्याच्या प्रक्रियेत पर्रीकर यांचे मत सध्या तरी विचारले जात नाही, अशी माहिती मिळाली.
नवा मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गोवा भाजपाचे काम पाहणारे निरीक्षक बी. एल. संतोष, विजय पुराणिक आदींशी चर्चा करून ठरवतील. खासदार नरेंद्र सावईकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व गोव्यातील भाजपाचे एक किंवा दोन मंत्री यांचेही मत जाणून घेतले जाईल. सद्या शहा यांनी ती प्रक्रिया आरंभिली असून श्रीपाद नाईक व विश्वजित राणे हे त्याचसाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. नवा मुख्यमंत्री जरी भाजपामधीलच एखादा नेता असेल, तरी देखील विद्यमान सरकार हे आघाडीचे असल्याने मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर व गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांच्या मतालाही अजून महत्त्व आहे. ढवळीकर व सरदेसाई या दोन्ही नेत्यांची व त्यांच्या पक्षांची बार्गेनिंग पावर तथा वाटाघाटी करण्याबाबतची शक्ती भाजपाने कमी केलेली आहे. मात्र नवा मुख्यमंत्री त्यांच्यावर लादला जाणार नाही, त्यांच्याशी चर्चा करूनच ठरवला जाईल, असे सुत्रांनी सांगितले.
नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी पर्रीकर यांना काय वाटते हा विषय सध्या पक्षासाठी दुय्यम आहे. फ्रान्सिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णयही दिल्लीतच झाला होता. त्यावेळी गोव्याच्या खासदारांना तेवढे शहा यांनी विचारले होते. तसेच शहा यांनी केंद्रातून गोव्यात पाठविलेल्या निरीक्षकांचा अहवाल शहा यांनी विचारात घेतला होता. पर्रीकर यांना थेट आदेश कळवून डिसोझा व मडकईकर यांना वगळावे असे सांगितले गेले होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयातून आल्यापासून पर्रीकर हे दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानीच असून तिथे डॉक्टरही उपलब्ध असतात. पर्रीकर यांच्याशी संवाद साधून त्यांना आणखी कसलाच त्रास द्यायचा नाही असे भाजपामध्ये ठरले आहे. पर्रीकर हे त्यांच्या कुटुंबियांशीच तूर्त संवाद साधतात.