ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - त्रिशंकू निकाल लागलेल्या गोव्यात आमदारांच्या संख्येत मागे पडल्यानंतरही भाजपाने काँग्रेसला धोबीपछाड देत बहुमताचे गणित जुळवले आहे. आता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर उद्या शपथ घेणार आहेत. दरम्यान, पर्रीकर यांनी आज संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पर्रीकर यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्या जागी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षणमंत्रीपदाचा अतिरिक्त प्रभार सोपवला आहे.
मनोहर पर्रिकर तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. याआधी पर्रीकर यांनी 2000 ते 2005 आणि 2012 ते 2014 या काळात गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र 2014 साली त्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यावेळी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गोव्यात त्रिशंकू निकाल लागल्यानंतर रविवारी सकाळपासून सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. भाजपाकडून पर्रीकर यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तेव्हा सर्वप्रथम मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी पाठिंबा दर्शविला. मगोपकडे तीन आमदार आहेत. त्यानंतर गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनीही पाठिंब्याची हमी दिली. गोवा फॉरवर्डकडेही तीन आमदार आहेत. पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि प्रसाद गावकर या तीन अपक्षांनीही पर्रीकर यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला
Manohar Parrikar resigns as Defence Minister, to take oath as Goa Chief Minister tomorrow. pic.twitter.com/sALGKEDKge— ANI (@ANI_news) March 13, 2017