पणजी : मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री म्हणून मंगळवारी चौथ्यांदा शपथ घेतली. पर्रीकर यांच्याव्यतिरिक्त आणखी नऊ मंत्र्यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. उद्या गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जाहीर केले.राजभवनवर मंगळवारी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडला. पर्रीकर यांनी कोकणीतून शपथ घेतली. शपथ घेताना त्यांच्याकडून थोडी चूक झाली. मुख्यमंत्री असा शब्द वापरण्याऐवजी मंत्री म्हणून शपथ घेत आहे, असा उल्लेख चुकून झाला. यामुळे पर्रीकर यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. या वेळी मावळते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व्यासपीठावर उपस्थित होते.दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांना शपथ देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांना राज्यपालांनी शपथ दिली. नंतर भाजपचे फ्रान्सिस डिसोझा, मगोपचे बाबू आजगावकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, भाजपचे पांडुरंग मडकईकर, अपक्ष गोविंद गावडे, गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर आणि जयेश साळगावकर यांनाही शपथ देण्यात आली. (खास प्रतिनिधी)
पर्रीकर उद्या करणार बहुमत सिद्ध
By admin | Published: March 15, 2017 1:28 AM