सद्गुरू पाटील, पणजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत २२ विरुद्ध १६ अशा मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेसचे आमदार विश्वजीत राणे यांनी ठरावावेळीच अनुपस्थित राहून काँग्रेसला धक्का दिला.सर्वोच्च न्यायालयाने पर्रीकर यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. विश्वासदर्शक ठरावावर हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी मतदान घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसने पर्रीकर यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र राज्यपालांना सादर केलेले नाही; पण राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनीही उभे राहून ठरावास पाठिंबा दिला. अपक्ष आमदार प्रसाद गावकरही ठरावाच्या बाजूने उभे राहिले. ठरावाच्या विरुद्ध काँग्रेसचे १६ आमदार उभे राहिले. सतरावे आमदार विश्वजीत राणे त्या वेळी सभागृहातून बाहेर गेले होते. काँग्रेस पक्षाकडे कधीच बहुमत सिद्ध करण्याएवढे संख्याबळ नव्हते. कॉँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग गोव्यात आराम करण्यासाठी येतात, काम करण्यासाठी येत नाहीत म्हणून असे घडते. - मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवाविश्वजीत राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारता, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे, असे ते म्हणाले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंचे विश्वजीत पुत्र आहेत. हंगामी सभापतींनी राणे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ते नव्याने विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
गोव्यामध्ये पर्रीकर जिंकले!
By admin | Published: March 17, 2017 4:04 AM